Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पत्नीची निर्घृण हत्या प्रकरणी पतीला फाशीची शिक्षा; विटा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल'रेअरेस्ट ऑफ रेअर' मानत जन्मठेपऐवजी मृत्युदंड; एक लाखांचा दंडही ठोठावला

पत्नीची निर्घृण हत्या प्रकरणी पतीला फाशीची शिक्षा; विटा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
'रेअरेस्ट ऑफ रेअर' मानत जन्मठेपऐवजी मृत्युदंड; एक लाखांचा दंडही ठोठावला

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भुड (बुद) येथील पत्नीची पेट्रोल टाकून जाळल्यानंतर गळा चिरून निर्घृण हत्या करणाऱ्या पतीला विटा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश रविकिरण रामकृष्ण भागवत यांनी हा निकाल देताना हा गुन्हा 'रेअरेस्ट ऑफ रेअर' स्वरूपाचा असल्याचे नमूद केले.

या प्रकरणातील आरोपी रामचंद्र आनंदा कदम (वय ४१, रा. भुड, ता. खानापूर, जि. सांगली) याला भारतीय न्याय संहिता कलम ३०२ अंतर्गत मृत्युदंडाची शिक्षा, तसेच ₹१ लाख दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम मृत महिलेच्या मुलांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, आरोपी पत्नी दिपाली कदम हिच्यावर वारंवार चारित्र्याचा संशय घेत होता. तसेच तिच्याकडे पैशांची मागणी करून तिला मारहाण व शिवीगाळ करत होता. ७ जून २०२१ रोजी पहाटे आरोपीने पत्नीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. ती वाचण्याची शक्यता असल्याचे लक्षात आल्यानंतर तिचा गळा चाकूने चिरून तिची हत्या केली. उपचारादरम्यान ११ जून २०२१ रोजी दिपाली यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक जे. पी. जाधव यांनी केला. तपासादरम्यान वैद्यकीय पुरावे, न्यायवैद्यकीय अहवाल, घटनास्थळावरील जप्ती आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे सादर करण्यात आले.

सरकारी पक्षातर्फे ॲड. आरती आनंद देशपांडे (साटविलकर) यांनी प्रभावी युक्तिवाद करत हा गुन्हा पूर्वनियोजित आणि अत्यंत क्रूर स्वरूपाचा असल्याने आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. न्यायालयाने ती मान्य करत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.

या खटल्यात विटा पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी तसेच इतर पोलिस अधिकाऱ्यांनी साक्षीदार हजर ठेवणे व तपासात महत्त्वाचे सहकार्य केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.