Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली पोलीस दलातर्फे सायबर गुन्हे व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती२० हजार विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती

सांगली पोलीस दलातर्फे सायबर गुन्हे व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती
२० हजार विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली पोलीस दलातर्फे संजयनगर येथील बिरनाळे पब्लिक स्कूलमध्ये "सायबर गुन्हे, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, महिला सुरक्षा व वाहतूक सुरक्षा" या विषयांवर विशेष जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या सायबर धोक्यांविषयी आणि अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या नुकसानाबाबत सतर्कता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

अंमली पदार्थांच्या सेवनाला 'नाही' म्हणा डॉ. चंद्रशेखर हळींगळे यांनी तरुणांमधील व्यसनाधीनतेचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दुष्परिणाम विशद केले. अंमली पदार्थांच्या सेवनाला स्पष्टपणे 'नाही' म्हणण्याचे आवाहन करत त्यांनी तणावमुक्तीसाठी व्यायाम आणि ध्यानधारणा यांसारख्या निरोगी सवयींचा अवलंब करण्याचा सल्ला दिला. डिजिटल सुरक्षितता आणि सोशल मीडियाचा वापर यावर सांगली सायबर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे रक्षण करण्याचे मार्ग सांगितले. कोणत्याही अनोळखी लिंक्स किंवा संशयास्पद 'APK' फाईल्सवर क्लिक न करण्याचा महत्त्वाचा इशारा त्यांनी दिला. 

डिजिटल अरेस्ट आणि फसव्या योजनांपासून सावधान राहा 
सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले की, सायबर गुन्हेगारी आणि व्यसनाधीनता हे आज समाजापुढील मोठे आव्हान आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल अरेस्ट, जादा परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या फसव्या योजना आणि ऑनलाईन फ्रॉडबाबत माहिती दिली. तसेच कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी ११२ (112) या आपत्कालीन क्रमांकावर आणि सायबर फसवणूक झाल्यास १९३० (1930) या हेल्पलाइनवर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले.

YouTube वरून थेट प्रक्षेपण:
हा संपूर्ण कार्यक्रम सांगली पोलीस दलाच्या अधिकृत YouTube वाहिनीवरून थेट (Live) प्रसारित करण्यात आला होता. सांगली जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील सुमारे १९ ते २० हजार विद्यार्थ्यांनी या जनजागृती कार्यक्रमाला ऑनलाईन माध्यमातून उपस्थिती लावली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.