महाराष्ट्रात पुन्हा पावसाची दमदार बॅटिंग !
चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून विदर्भातील चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
विदर्भात मान्सूनने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केलं असून, पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व आणि मध्य भारतात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं असून, त्याचा थेट परिणाम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. हवामान विभागाने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नागपूर, वर्धा आणि पश्चिम विदर्भातील काही भागांमध्येही पुढील ४८ तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर आर्द्रता निर्माण झाली आहे. त्यामुळे विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळू शकतात. नदी-नाले, ओढे आणि धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनीही पुढील काही दिवस हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच प्रवास आणि इतर कामांचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः मुसळधार पावसाच्या काळात नदी-नाल्यांजवळ जाणे टाळावे, तसेच पूरप्रवण भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि इतर पिकांच्या वाढीस पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. पावसामुळे विदर्भातील तापमानातही घट झाली असून, उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.