तडीपार आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त
सांगलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आणि अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक तुषार दोषी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) कारवाई करत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या एका अट्टल आरोपीला बेकायदेशीर देशी बनावटीच्या पिस्टलसह रंगेहात अटक केली आहे.
होळकर चौक ते रेल्वे स्टेशन रोडवर कारवाई
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील पोलीस अंमलदार सागर लवटे आणि विक्रम खोत यांना गोपनीय बातमीदाराद्वारे बातमी मिळाली की, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून मार्च २०२५ मध्ये दोन वर्षांसाठी तडीपार (हद्दपार) करण्यात आलेला रेकॉर्डवरील आरोपी स्वप्निल प्रकाश कोलप (वय ३६ वर्षे, रा. अंकली, ता. मिरज, जि. सांगली) हा होळकर चौक ते रेल्वे स्टेशन रोड परिसरात बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगून थांबला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकाने परिसरात सापळा रचून संशयित आरोपीला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले.
सक्षम प्राधिकाराची कोणतीही परवानगी न घेता सांगली जिल्हा हद्दीत प्रवेश करणाऱ्या या आरोपीची पंचांसमक्ष अंगझडती घेण्यात आली. या वेळी त्याच्या कमरेला डाव्या बाजूला पॅन्टमध्ये १ देशी बनावटीचे पिस्टल, पॅन्टच्या खिशात १ जिवंत काडतूस (राऊंड) आणि ४०० रुपये रोख रक्कम असा एकूण ५०,९०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदर शस्त्राबाबत त्याच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नव्हता.
ईश्वरपूर / संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अवैध अग्नीशस्त्र बाळगणे आणि हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोहेकॉ सागर लवटे यांच्या फिर्यादीवरून आरोपी स्वप्निल कोलप याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे पथक
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. नि. प्रशांत निशाणदार, सागर लवटे, अनिल कोळेकर, नागेश खरात, सतीश माने, अमर नरळे, सागर टिंगरे, मोतीराम खोत, संदीप गुरव, उदयसिंह माळी, संदीप नलावडे, मच्छिंद्र बडे, पोशि विक्रम खोत आणि केशव चव्हाण यांच्या पथकाने केली.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या आणि शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे करणाऱ्यांवर अशीच कठोर मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.