Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'नशामुक्त भारत अभियान' अंतर्गत सराईत गांजा विक्रेता गजाआड४३,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त : मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई

'नशामुक्त भारत अभियान' अंतर्गत सराईत गांजा विक्रेता गजाआड
४३,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त : मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई 

पूजा फडके 
मिरज : खरा पंचनामा 

भारत सरकारच्या “नशामुक्त भारत अभियान” पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलिसांकडून अंमली पदार्थ विक्री व नशाखोरीवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज च्या पथकाने धडक कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून, त्याच्याकडून गांजाच्या १०३ पुड्यांसह ४३,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक नानासाहेब लक्ष्मण चंदनशिवे यांना दिनांक ०९ जुलै रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली. मिरज येथील डॉ. आंबेडकर उद्यानाच्या मागील बाजूच्या अंधाऱ्या बोळात एक सराईत गुन्हेगार गांजा विक्रीसाठी येणार असल्याची ती खात्रीलायक माहिती होती. प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत गाडवे, पंच आणि फोटोग्राफर यांच्यासह पोलीस पथकाने तात्काळ तिथे सापळा रचला. संशयित इसम तिथे मोटारसायकलवर प्लास्टिकची पिशवी घेऊन थांबलेला दिसताच, पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

 संशयित आरोपीचे नाव खालीद रियाज मोमीन (वय ३४ वर्ष, रा. अमर टॉकीजसमोर, ख्वॉजा झोपडपट्टी, मिरज, जि. सांगली) असून जप्त केलेला मुद्देमाल ५७६ ग्रॅम वजनाचा तयार गांजा, (१०३ प्लास्टिकच्या छोट्या पुड्या) आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, असा एकूण ४३,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अभिलेखावर आधीपासूनच गांजा विक्रीचे अनेक गुन्हे दाखल असलेला खालीद मोमीन हा सराईत गुन्हेगार आहे. मिरज परिसरात चढ्या दराने किरकोळ स्वरूपात गांजा विक्री करण्यासाठी त्याने हा साठा आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गु.र.नं. २४४/२०२६ अन्वये अंमली औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) कलम ८(क), २०(ब) ii (अ), २२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर धडक कारवाई सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, आणि मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. मुकुंद कुलकर्णी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पार पडली.

स.पो.नि. संदीप शिंदे, पो.उ.नि. विश्वजीत गाडवे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजीत धनगर, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, पो.ना. नानासाहेब चंदनशिवे, पो.कॉ. जावेद शेख, विनोद चव्हाण, मोसीन टिनमेकर, राजेंद्र हारगे, अमोल तोडकर, रामकृष्ण सुरवसे, चालक श्रेणी पो.उ.नि. सतीशकुमार पाटील आणि चालक पो.ना. देवानंद नागरगोजे हे पथक कारवाईत सहभागी होते.

पालकमंत्र्यांकडून यापूर्वीच कौतुक:
महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने यापूर्वीही नशेची इंजेक्शन्स, गांजा, सुगंधी तंबाखू आणि गुटख्याविरुद्ध सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेऊन सांगली जिल्ह्याचे मा. पालकमंत्री  चंद्रकांतदादा पाटील यांनी पोलीस पथकाचे जाहीर कौतुक करत त्यांना प्रशंसापत्र देऊन सन्मानित केले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.