Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीहल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर."मनोज जरांगेंचा थेट जंतर मंतरवरुन सरकारला इशारा

"विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीहल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर."
मनोज जरांगेंचा थेट जंतर मंतरवरुन सरकारला इशारा

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

नीट परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीकडून दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. 20 जुलै रोजी झालेल्या 'चलो संसद' रॅलीदरम्यान आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बेछूट लाठीचार्ज केला आणि त्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली. या आंदोलनाला अनेक राजकीय नेते मंडळींसह, मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनी पाठिंबा दिला आहे.

अनेक दिग्गज मंडळींनी स्वतः आंदोलनस्थळी उपस्थित राहत विद्यार्थांना समर्थन देण्याची भूमिका बजावली. उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, शरद पवार, अमित ठाकरे, संजय राऊत यांनी जंतरमंतरवर येऊन अभिजीत दिपकेंची भेट घेतली. यानंतर आज मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील दिल्लीत जंतर-मंतरवर पोहोचले आहेत. यावेळी जरांगे यांनी अभिजीत दिपके यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यानंतर आंदोलकांना जंतर मंतर सोडू नका, असे आवाहन केले.

"आम्ही तुमच्यासोबत आहोत. सरकारला आपण निवडून दिलेलं आहे. आपल्या मायबापाने यांना मतदान केल आहे. आपल्या जिल्ह्याने, तालुक्याने यांना मतदान केल. या पुढच्या काळात तुम्हाला धक्का जरी लागला तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. सगळा देश आणि राज्य तुमच्या पाठिशी आहे," असा विश्वास यावेळी मनोज जरांगे यांनी विद्यार्थांना दिला.

"तुम्ही जंतर मंतर सोडू नका. वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येतील. विद्यार्थ्यांनी शांत रहावं. संसदेकडे जाऊ नये. ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करतील. आम्ही अंतरवाली सराटी इथं गोरगरिबांच्या लेकरांसाठी आंदोलन केलं. तेव्हाही यांच्या सरकारने लहान मुलं, महिलांवर लाठीचार्ज केला. या सरकारने आमच्यावरही गोळ्या घातल्या होत्या. शांततेच्या आंदोलनात किती ताकद आहे ते आपण महाराष्ट्रात पाहिलं आहे," असेही मनोज जरांगे यांनी सांगितले.

"आमच्या आंदोलनाची पद्धत वेगळी आहे. ते जेव्हा सांगतील, बोलवतील त्यावेळी आम्ही येऊ असा मी शब्द दिला आहे. त्यांनी जर हाक मारली तर मी येणारच, शांततेच्या आंदोलनात किती ताकद आहे आम्ही दाखवून दिल. आपण विद्यार्थी म्हणून या आंदोलनाकडे बघूया. गोरगरीबांची लेकरं देशभरात आहेत. " असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

"दिल्ली आपल्या देशाची राजधानी आहे. न्याय मिळाला नाही तर आपण राजधानीत येतो. सोनमजी, अभिजीत आंदोलनाला बसलेत. आपल्याला त्यांना साथ दिली पाहिजे. ज्यांना आपण निवडून दिल, त्यांना जाणीव करुन द्यायची गरज आहे. हे भाजपाचे सरकार प्रत्येकवेळी गोरगरिबांच्या लेकरांवर अन्याय करते. यापुढच्या काळात जर विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करण्याचा प्रयत्न सरकारने केला, तर राज्यात भाजपच्या नेत्यांना फिरू देणार नाही. यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.