भाड्याने राहणाऱ्या पोलिसाकडून घरमालकाच्या मुलीला लग्नाचं आमिष, वारंवार अत्याचार
अल्पवयीन मुलीचा मृत्यू; चॅटवरुन प्रकरणाचा उलगडा
अकोला : खरा पंचनामा
अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे एका पोलीस कर्मचाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या अल्पवयीन पीडित तरुणीचा काल शनिवारी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे बाळापूर शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, संशयित आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्या अटकेसाठी सुमारे 40 पोलीस कर्मचाऱ्यांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे हा बाळापूर येथे भाडेकरू म्हणून राहत होता. त्याने घरमालकाच्या पीडित अल्पवयीन मुलीला विवाहाचं आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, नंतर त्याने विवाहास स्पष्ट नकार दिला. या मानसिक धक्क्यातून पीडित तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान ती सतत बेशुद्धावस्थेत होती.
तरुणीच्या मोबाईलमधील चॅट आणि संदेशांवरून या संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश झाल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी तरुणीच्या वडिलांनी 12 जुलै रोजी बाळापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र, कारवाईस विलंब होत असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी 24 जुलै रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलनही केलं होतं. पीडितेची प्राणज्योत मालवल्यानंतर शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तरुणीच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनाचं संपूर्ण चित्रीकरण करण्यात यावं, अशी मागणी नातेवाईक व नागरिकांकडून करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून तपासात विलंब झाल्याच्या आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल, असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलं असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाला अत्यंत दुर्दैवी वळण लागलं आहे. घरात भाड्याने राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावरती उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय. दरम्यान, आरोपी पोलीस कर्मचारी अद्याप फरार असून, त्याच्या तातडीने अटकेची मागणी अधिक तीव्र झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.