IPS महिला ट्रेनीचे IPS पुरुष ट्रेनीने आक्षेपार्ह व्हीडिओ बनवले : गुन्हा दाखल
हैदराबाद : खरा पंचनामा
एका महिला IPS प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्याच सहकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. हैदराबादमध्ये प्रोबेशनवर असलेल्या या महिला अधिकाऱ्याने तिचा सहकारी आयपीएस ट्रेनी उदय कृष्णा रेड्डी याच्याविरोधात ही तक्रार दिली आहे.
रेड्डीने आपला सतत छळ केला, गैरवर्तन केलं, मारहाण केली आणि खासगी व्हिडिओ रेकॉर्ड करून धमकावलं, असा गंभीर आरोप या 30 वर्षीय महिला अधिकाऱ्याने केला आहे.
पीडित महिला अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, उदय कृष्णाने 23 जून रोजी व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठवून तिला त्रास द्यायला सुरुवात केली. इतकंच नाही, तर त्याने इतर सहकाऱ्यांसमोर तिच्याबद्दल घाणेरड्या कमेंट्स केल्या. पीडित महिला अधिकारी विवाहित असून, तिचे बॅचमधील दुसऱ्या एका अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा खोटा आरोपही त्याने केला. हा आरोप कबूल करण्यासाठी त्याने तिच्यावर दबाव टाकला आणि शिवीगाळही केली, असं तक्रारीत म्हटलं आहे.
उदय कृष्णाने आपला मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि खासगी चॅट्स तपासण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप आहे. त्याने तिला जबरदस्तीने एका खोलीत नेऊन फोनचा पासवर्ड मागितला. 9 जुलै रोजी तर त्याने तिला जबरदस्तीने स्वतःच्या खोलीत नेऊन मारहाण केली. त्याने तिचे केस ओढले, गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि गळ्यावर चाकू ठेवून तिला धमकावलं. यावेळी त्याने तिच्यासमोर कंडोमची पाकिटंही फेकली. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी त्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, असंही तक्रारीत नमूद आहे.
आरोपी उदय कृष्णाने तिचे काही खासगी व्हिडिओ फोनमध्ये रेकॉर्ड केल्याचाही आरोप पीडितेने केला आहे. हे व्हिडिओ तिच्या पतीला पाठवून त्याने तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. तिची समाजात बदनामी करणे आणि तिची प्रतिमा खराब करणे हाच त्याचा उद्देश होता, असं महिला अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
या महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी उदय कृष्णाविरोधात महिलेचा विनयभंग आणि छळवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच आयटी अॅक्टच्या विविध कलमांखालीही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.