NEET पेपरफुटी प्रकरण : CBI च्या 4 प्रश्नांनी प्राध्यापक गार, तब्बल 6 तास चौकशी ; मोबाईल जप्त
पुणे : खरा पंचनामा
राजधानी दिल्लीत नीट पेपरफुटी आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून आंदोलन सुरू असतानाच, दुसरीकडे महाराष्ट्रातील लातूरमध्ये सीबीआयने नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाचा वेग वाढवला आहे. कोचिंग क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर आता स्थानिक शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
री-नीट परीक्षेचा निकाल समोर आल्यावर सीबीआयचे पथक लातूरमध्ये दाखल झाले. एका प्रसिद्ध महाविद्यालयातील रसायनशास्त्राच्या (केमिस्ट्री) वरिष्ठ प्राध्यापकाला सकाळी ८ वाजता शासकीय विश्रामगृहावर चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. विशेष म्हणजे, संबंधित प्राध्यापकाची मुलगी मोटेगावकर यांच्याच क्लासची विद्यार्थिनी असल्याने तिलाही तिचे प्रवेशपत्र घेऊन बोलावले गेले. अधिकाऱ्यांनी मुलीची तब्बल 3 तास कसून चौकशी केल्यानंतर तिला सोडले. मात्र प्राध्यापकाची चौकशी दुपारी 1.30 वाजेपर्यंत सुरूच होती.
तपासादरम्यान सीबीआयने प्राध्यापकाचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. या मोबाईलमध्ये परीक्षेच्या 3 दिवस आधीच केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका पाठवण्यात आल्याचे डिजिटल पुरावे सापडल्याची माहिती समोर येत आहे. हा मोबाईल आता फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
तपासादरम्यान सीबीआय अधिकाऱ्यांनी प्राध्यापकाला अनेक प्रश्न विचारले.
1. प्रश्नपत्रिका मिळण्याबाबतः प्राध्यापकाने मान्य केले की मोटेगावकरने पेपर पाठवला होता, परंतु तो आधी उघडून पाहिला नसल्याचा दावा त्यांनी केला.
2. आर्थिक व्यवहारः मोटेगावकर यांच्याशी कोणतेही संशयास्पद व्यवहार झाले नसल्याचे सांगत, केवळ मुलीच्या क्लासच्या फीचे पैसे रोखीने दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
3. भेटण्याचे कारणः मुलीच्या शिक्षणाच्या कामासाठीच मोटेगावकर यांची भेट घेतल्याचे प्राध्यापकाने सांगितले.
4. प्रश्नपत्रिका कोणाकोणाला पाठवल्या परीक्षा संपल्यानंतर ते प्रश्न पाहील्याचे प्राध्यापकाने सांगितले.
सध्या सीबीआयने प्राध्यापकाला घरी जाऊ दिले असले, तरी त्यांनी दिलेल्या उत्तरांची खातरजमा केली जात असून पुढील तपासात नवीन खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.