Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तूर्तास रम, मॅकडॉवेल्स विसरा, दारूच्या ब्रँडबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय

तूर्तास रम, मॅकडॉवेल्स विसरा, दारूच्या ब्रँडबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय

मुंबई : खरा पंचनामा 

रम आणि व्हिस्की उत्पादनातील कथित अनधिकृत फ्लेवरिंग आणि लेबलिंगवरून सुरू असलेल्या वादाला आता न्यायालयीन वळण मिळाले आहे. मॅकडॉवेल रमच्या उत्पादन आणि विक्रीवरील बंदी तूर्त मागे घेता येणार नाही, अशी माहिती केंद्र सरकारने मुंबई हायकोर्टात दिली. दरम्यान, संबंधित मद्य उत्पादक कंपन्यांना आपले उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मॅकडॉवेल रमवरील कारवाईसंदर्भातील याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने न्यायालयाला महत्त्वाची माहिती दिली. रमवरील बंदी सध्या मागे घेता येणार नाही, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

तसेच, उपलब्ध असलेला रमचा साठा विक्रीस काढायचा असल्यास त्यावर आवश्यक त्या पद्धतीने फ्लेवरची नोंद करावी लागेल, अशी माहितीही न्यायालयात देण्यात आली. संबंधित याचिकेचे उत्तर केंद्र सरकारकडून सादर केले जाणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

हंगामी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी बाजू मांडली.

मॅकडॉवेल रमच्या याचिकेवर केंद्र सरकारकडून उत्तर सादर केले जाईल. तोपर्यंत बंदी उठवण्याबाबत कोणतेही भाष्य करता येणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने न्यायालयासमोर मांडली.

मॅकडॉवेल रमचे उत्पादन पुणे येथे होत असल्याचे या प्रकरणाशी संबंधित माहितीत नमूद करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने म्हणजेच FSSAI ने उत्पादनस्थळी तपासणी आणि धाड टाकल्यानंतर रमच्या उत्पादन व विक्रीवर कारवाई केली.

रमच्या बाटलीवर फ्लेवर आणि वयोमानासंदर्भातील आवश्यक माहिती स्पष्टपणे नमूद नसल्याचा आक्षेप FSSAI कडून घेण्यात आला. त्यानंतर संबंधित उत्पादनाच्या लेबलिंग आणि उत्पादन प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित झाले.

या कारवाईचा फटका लोकप्रिय मद्य ब्रँडच्या निर्मात्यांना बसल्याचा दावा करण्यात आला आहे. Old Monk, McDowell's, Bagpiper, Antiquity Blue आणि Royal Challenge यांसारख्या लोकप्रिय ब्रँडच्या निर्मात्यांवरही अनधिकृत स्वाद पद्धती वापरल्याचे आणि मद्याच्या वयाबाबत दिशाभूल करणारे दावे केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र या कंपन्यांवरील आरोप आणि त्यांची कायदेशीर बाजू संबंधित प्रक्रियेत तपासली जाणार आहे.

FSSAI च्या म्हणण्यानुसार, काही कंपन्या रम आणि व्हिस्कीमध्ये बाहेरून फ्लेवर मिसळत असल्याचे तपासणी आणि प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.

नियमांनुसार रम किंवा व्हिस्कीची चव आणि सुगंध विशिष्ट उत्पादन प्रक्रियेत नैसर्गिकरीत्या विकसित होणे अपेक्षित असल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. मात्र काही उत्पादने न्यूट्रल अल्कोहोल किंवा एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोलपासून तयार करून त्यात बाहेरील फ्लेवर मिसळला जात असल्याचा आक्षेप आहे.

अशा उत्पादनांना रम फ्लेवर्ड स्पिरिट किंवा व्हिस्की फ्लेवर्ड स्पिरिट म्हणून योग्य लेबलिंग करणे आवश्यक असल्याचे FSSAI चे म्हणणे आहे. ग्राहकांना उत्पादनाचे स्वरूप स्पष्टपणे समजावे आणि त्यांची दिशाभूल होऊ नये, हा त्यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.