"आता मी जास्त काम करू शकत नाही"
नागपूर : खरा पंचनामा
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या रविवारी केलेल्या एका विधानावरून देशभरात दोन दिवसांपासून त्यांच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. गडकरी यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेतली. त्यांच्या कार्यालयाकडून गडकरी यांच्या वक्तव्याचा राजकीय विधान म्हणून अर्थ लावण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या राजकीय निवृत्तीच्या चर्चेला त्यांच्या कार्यालयाने पूर्णविराम दिला आहे. एका कार्यक्रमात गडकरी यांनी केलेले वक्तव्य राजकीय संदर्भातील नसून, लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या भविष्यातील नेतृत्वासंदर्भात होते, असे त्यांच्या कार्यालयाने मंगळवारी स्पष्ट केले. त्यांच्या वक्तव्याचा राजकीय अर्थ काढत काही माध्यमांमध्ये गडकरी राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर त्यांच्या कार्यालयाने निवेदन जारी करून हा दावा फेटाळला. गडकरी यांनी रविवारी झालेल्या कार्यक्रमात आपल्या तीन दशकांहून अधिक काळाच्या सार्वजनिक जीवनाचा उल्लेख केला. या प्रवासात अनेक चढ-उतार पाहिले, विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि अनेक सन्मान मिळाले, असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी आता पूर्वीइतके काम करता येत नसल्याने तरुण पिढीला अधिक जबाबदारीची संधी दिली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
केंद्रीयमंत्री गडकरी यांनी स्थापन केलेल्या लक्ष्मणराव मानकर ट्रस्टतर्फे आदिवासी भागात एकल विद्यालये चालविली जातात. ट्रस्टच्या कामकाजाशी संबंधित संदर्भातच तरुण पिढीला अधिक जबाबदारी देण्याबाबत गडकरी बोलले होते. हा कार्यक्रम नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यामधील पारडसिंगा येथे रविवारी झाला होता.
पक्षाचे काम करीत असताना समोसा खाऊन झोपत असे. कुठलीही शिस्त नव्हती. परंतु कोरोना काळानंतर शिस्तीत आलो. आता दररोज योगा करतो. तब्येत चांगली असेल तर सर्वच आनंद घेता येईल. तब्येत चांगली नसेल तर सत्ता काही कामाची नाही. परंतु आता मी जास्त काम करू शकत नाही. त्यामुळे नव्या पिढीला संधी दिली पाहिजे, असे ते म्हणाले होते. गेल्या ३० वर्षांपासून संस्थेचे काम करतो, कामात अनेक चढउतार आले. राज्यातील अनेक पुरस्कार या संस्थेला मिळाले. आता आम्ही संस्थेचे मार्गदर्शक म्हणून काम करीत आहे. हा गौरव १४०० शिक्षक व पर्यवेक्षकांच्या कार्याचा आहे, असे ते म्हणाले होते.
सामाजिक जागृती, संवेदनशीलता, दायित्व या तिन्ही गोष्टीचा विचार करून समाजाची वर्तमान स्थिती बदलवायची आहे. आदर्श, समृद्ध समाज निर्माण करण्याचा आपला संकल्प आहे. थोर क्रांतीकारक व देशभक्तांनी आपल्याला प्रेरणा दिली आहे. त्यांनी स्वराज्यासाठी बलिदान केले. सुराज्य निर्मितीसाठी लोकशिक्षण, लोकसंस्कारातून घडलेला समाज आवश्यक आहे. शोषित, पिडित, दलितांना परमेश्वर मानून त्यांची सेवा करण्यासाठी आपल्याला अनेक वर्षे काम करायचे आहे. स्वतःच्या प्रकृतीकडेही लक्ष द्या, असा सल्ला त्यांनी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना दिला होता. गेली अनेक वर्षे विदर्भातील शेतकरी कर्जात जगतो आणि मरत आहे. त्यांच्या गळ्याला खाज सुटते म्हणून ते गळफास लावत नाही. हे चित्र बदलायचे आहे. ज्यांच्या जीवनात अंधार आहे, त्यांच्यासाठी काम करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.