Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बिळूर येथे चुलत्याच्याच घरात घातला दरोडा; सांगली एलसीबीकडून आरोपीस अटक, ८.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त

बिळूर येथे चुलत्याच्याच घरात घातला दरोडा;  सांगली एलसीबीकडून आरोपीस अटक, ८.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

जत तालुक्यातील बिळूर येथे चुलत्याच्या बंद घराचा कडी-कोयंडा उघडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB), सांगलीच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून ८ लाख ८१ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून न्यायालयाने त्याला १७ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बिळूर येथील रावसाहेब बाबू घेज्जी (वय ४९) यांच्या घरी २३ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास कोणी नसताना चोरी झाली होती. चोरट्याने घरात प्रवेश करून किचनमधील स्टीलच्या डब्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा (गु.र.नं. ४१७/२०२६, BNS कलम ३०५ (अ), ३३१ (३)) दाखल करण्यात आला होता. मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले होते. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व पथक संशयितांचा शोध घेत होते.

दरम्यान, पथकाला माहिती मिळाली की, प्रशांत चिन्नाप्पा घेज्जी (वय ३०, रा. डोणीपीर वस्ती, बिळूर) हा चोरलेले दागिने विकण्यासाठी जत-कवठेमहांकाळ रस्त्यावरील जाधव वस्ती येथील बंद हॉटेल सानिया गार्डन परिसरात येणार आहे. मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलिसांनी तेथे सापळा रचून प्रशांत घेज्जी याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता पॅन्टच्या खिशात सोन्याच्या चैनी, झुमके, पट्टी, अंगठी, गंठण आणि चांदीची अंगठी आढळून आली.

पोलीस चौकशीदरम्यान आरोपी प्रशांत घेज्जी याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तक्रारदार रावसाहेब घेज्जी हे आरोपीचे चुलते असून घर बंद असल्याचा फायदा घेऊन त्याने ही चोरी केली होती. चोरीतील रोख रक्कम त्याने स्वतःच्या खर्चासाठी वापरल्याचेही कबूल केले.

जप्त मुद्देमालमध्ये सोन्याचे दागिने (८० ग्रॅम): रु. ८,७८,७९०/-, चांदीचे दागिने (०५ ग्रॅम): रु. २,५००/-एकूण जप्त मुद्देमाल: ८,८१,२९०/- रुपये असा आहे. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपोनि राजेंद्र यादव, पोलीस अंमलदार संदीप पाटील, अतुल माने, मच्छिंद्र बर्डे, रणजीत जाधव, मोतीराम खोत, केरुबा चव्हाण, अभिजीत माळकर तसेच सायबर पोलीस ठाण्याचे विजय पाटणकर यांच्या पथकाने केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.