Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

१ कोटी ७५ लाखांच्या ३०० किलो गांजासह कंटेनर जप्तसांगलीत एलसीबीची मोठी कारवाई : सातारा येथील एकास अटक

१ कोटी ७५ लाखांच्या ३०० किलो गांजासह कंटेनर जप्त
सांगलीत एलसीबीची मोठी कारवाई : सातारा येथील एकास अटक
पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB), सांगली यांनी अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत १ कोटी ७५ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल ३०० किग्रॅ गांजा, एक सहाचाकी कंटेनर आणि मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करी व विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार व त्यांचे पथक शोध घेत होते. दि. २० रोजी गोपनीय बातमीदाराद्वारे बातमी मिळाली की, मंगेश प्रकाश मोरे (वय ४६, रा. बोरजाईवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) हा त्याच्या ताब्यातील अशोक लेलँड कंटेनरमधून (क्र. NL-01-AD-9366) गांजाची वाहतूक करत आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे मिरज-पंढरपूर महामार्गावरील तानंग फाटा ते मालगाव रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचून आरोपी मंगेश मोरे याला कंटेनरसह ताब्यात घेतले. कंटेनरच्या ड्रायव्हर केबिनमधील कप्प्याची पाहणी केली असता, त्यामध्ये २ किलो वजनाची १५० खाकी रंगाची पँकेट्स आढळून आली. पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यात हिरवट-काळपट रंगाचा ३०० किलो तयार गांजा मिळून आला.

जप्त केलेल्या मुद्देमालमध्ये 
 गांजा: १,५०,००,००० रुपये किमतीचा ३०० किलो गांजा (दर रु. ५०,००० प्रति किलो), वाहन: २५,००,००० रुपये किमतीचा अशोक लेलँड कंटेनर, (NL-01-AD-9366)
  इतर: १०,००० रुपयांचा रेडमी मोबाईल, एकूण जप्त रक्कम: १,७५,१०,००० रुपये (एक कोटी पंच्याहत्तर लाख दहा हजार रुपये) असा आहे.

ओडिशावरून आणला होता साठा:
प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपीने सदर गांजा बालेगोडा ते तुंम्बडी (राज्य ओडिशा) दरम्यानच्या एका शेतातून आणला असून तो पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा गांजा कोणाला दिला जाणार होता याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत निशाणदार, सुभाष सुर्यवंशी, सागर लवटे, संदीप गुरव, अतुल माने, संदीप नलावडे, अमीरशा फकीर, सागर टिंगरे, सोमनाथ गुंडे, अमर नरळे, अरुण पाटील, विक्रम खोत, विनायक सुतार, सुरज थोरात, सोमनाथ पतंगे, सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय पाटील यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.