मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
जालना : खरा पंचनामा
मराठा समाजातील महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील एका यु-ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये नवनाथ वाघमारे यांनी वादग्रस्त वक्तव्य करून समाजाच्या आणि महिलांच्या भावना दुखावल्या प्रकरणी शहरातील जालना पोलीस तक्रार देण्यात आली होती. यावेळी मराठा समाज बांधवांनी वाघमारे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर दोन समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य आणि महिलांना लज्जा वाटेल असे वक्तव्य केल्याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जालन्याचे पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.
नवनाथ वाघमारे यांनी यु-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ओबीसी नेत्यांच्या कुटुंबातील आंतरजातीय विवाहांचा उल्लेख केला होता. ओबीसी नेत्यांची गोंडस मुले पाहून मराठा समाजाच्या तरुणी घरात घुसतात. स्वतः बावनकुळे यांनी सांगितले की, माझी सून मराठा आहे. माझी बायको कुणबी आहे. त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील. फक्त बावनकुळे यांच्याच नाही तर अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्याच्या मुली घुसल्या आहेत. म्हणजे ओबीसी नेत्यांची, मंत्र्यांची गोंडस मुले दिसली की, मराठ्यांच्या मुली ओबीसी मंत्र्यांच्या घरात घुसतात. ओबीसी नेत्यांची मुलं, त्यांची आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्याकडे असलेला पैसा पाहून मराठा समाजातील मुली त्यांच्या घरी लग्न करुन जातात, अश आशयाची टिप्पणी नवनाथ वाघमारे यांनी केली होती. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील महिलांविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी खेद प्रकट केला आहे.
आपल्याकडून यापूर्वी कधीही असे वक्तव्य गेले नसून बावनकुळे यांच्यावर मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना ओघात आपल्याकडून हे वक्तव्य गेल्याचे स्पष्टीकरण नवनाथ वाघमारे यांनी दिले आहे. राज्यातील भगिनींनी मला समजून घ्यावं आणि मला पदरात घ्यावे, असे नवनाथ वाघमारे यांनी म्हटले. मनोज जरांगेंनी छगन भुजबळ, मुंडे बंधू-भगिनी आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर केलेल्या शिवीगाळ प्रकरणी मनोज जरांगे कधी माफी मागणार, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. मी कितीही आक्रमक बोललो तरी कधी कोणाच्या महिलांवर किंवा लेकी-बाळींवर बोलत नाही. मी कोणाच्या समाजाबाबतही बोलत नाही. पण तुम्ही मराठ्यांच्या लेकी-बाळींवर बोलून अत्यंत वाईट पातळी गाठली आहे. जो मराठ्यांच्या लेकी-बाळींवर बोलेल, त्याला यापुढे कोणालाही सुट्टी नाही तुमची दुसरी बाजू आणि काय कारनामे आहेत ते दाखवायचे का? मराठ्यांची मुलेही सोपी नाहीत. आता मराठेही तुम्हाला याच भाषेत उत्तर देतील, असे प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.