"कपिल सिब्बल यांचे आरोप बिनबुडाचे, माझाच निर्णय टिकून राहणार"
राहुल नार्वेकरांकडून ठाम विश्वास व्यक्त
मुंबई : खरा पंचनामा
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात सुनावणी निर्णायक टप्प्यावर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल हे बाजू मांडत आहे. कालच्या सुनावणीत कपिल सिब्बलांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयावरच आक्षेप नोंदवला.
तसेच नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं आहे. या युक्तिवादावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले की, "कपिल सिब्बल हे आपल्या अशिलाची बाजू न्यायालयासमोर मांडत आहेत. त्यामुळे त्यांना आपली भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांना जी बाजू मांडायची आहे, ती ते मांडतील.
मात्र, कपिल सिब्बल यांचं मत म्हणजे न्यायालयाचं मत नाही. मी दिलेला निर्णय हा कायद्याच्या चौकटीत राहून आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांच्या आधारे दिलेला आहे. खात्री आहे की हा निर्णय टिकून राहील", अशी स्पष्ट भूमिका राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले, "असे बिनबुडाचे आरोप करुन कोणताही फरक पडत नाही, मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे. या निर्णयामध्ये कोणताही बदल होईल असं मला वाटत नाही."
एकनाथ शिंदे गटाच्या नेतेपदासंदर्भातील निर्णयाबाबतही राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या 'ट्रिपल टेस्ट'चा आधार घेतल्याचं स्पष्ट केलं. संघटनेची रचना, घटनात्मक पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या तीन बाबींचा विचार करूनच निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्ट फॉर्म्युला दिलेला आहे. त्या आधारावर जे योग्य आहे, तो निर्णय घेतलेला आहे, असेही नार्वेकर म्हणाले.
दरम्यान, राजकीय पक्ष कुणाकडे आहे हे आधी विधानसभा अध्यक्षांनी ठरवणे अपेक्षित आहे. जर राजकीय पक्षामध्येही दोन गट असतील तर मूळ पक्ष कुणाकडे आहे हे विधानसभा अध्यक्षांनी पाहावे आणि त्या आधारे अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय घ्यायचा.
मात्र शिवसेना प्रकरणात नार्वेकरांनी दोन्ही गटांचे आमदार अपात्र केले नाहीत. त्यांनी शिंदेंचे व्हिप गोगावलेंना मान्यता दिली आणि पुढील निर्णय दिला आणि तो चुकीचा असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.