Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ठाकरेंच्या सहा फुटीर खासदारांनंतर आता शरद पवारांचे सर्व खासदार घेणार पंतप्रधानांची भेट

ठाकरेंच्या सहा फुटीर खासदारांनंतर आता शरद पवारांचे सर्व खासदार घेणार पंतप्रधानांची भेट 

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा फुटलेले खासदार आता शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत. त्यानंतर काल पहिल्यांदा या सर्व सहा खासदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांची भेट घालून दिली.

या भेटीमध्ये पंतप्रधानांनी त्यांना मी तुमच्या पाठिशी असल्याचं म्हटलं होतं. शिवसेना कोणाची? यावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीची मोठी चर्चा सुरु होती. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे सर्व आठ खासदार हे पंतप्रधानांची भेट घेणार आहेत, अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे. त्यामुळं आता दिल्लीत महत्वाच्या घडामोडी घडत असल्याचं चित्र आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेच्या ९ पैकी दोन तृतीयांश म्हणजेच ६ खासदार बंड करत एकनाथ शिंदेंच्या गोटात गेले आहेत. विकास कामासाठी निधी मिळत नसल्याचं कारण सांगत त्यांनी शिंदेंसोबत जाऊन केंद्रात सत्तेत राहण्याचा पर्याय स्विकारला आहे. त्यानंतर त्यांना लगेचच मोदी सरकारकडून विविध कामांच्या निमित्तानं निधी मंजूर झाल्याचं दिसून आलं होतं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे सध्या ८ खासदार आहेत. हे सर्वच्या सर्व खासदार पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या सर्व ८ खासदारांनी पंतप्रधान कार्यालयाकडं पंतप्रधान मोदींच्या भेटीची वेळ मागितली आहे. त्यानुसार, त्यांना पुढील आठवड्यात भेटीसाठी वेळ मिळू शकते, त्यामुळं पुढच्या आठवड्यात आता त्यांच्या भेटीवरुन राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे. या भेटीमागचा नेमका उद्देश काय? हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. पण संसदेचं अधिवेशन सुरु आहे, त्यामुळं कुठल्या महत्वाच्या विधेयकावर चर्चेबाबत किंवा पाठिंब्याबाबत ही भेट असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.