पाटगाव (मिरज) येथील तरुणाच्या हत्या प्रकरणाचा १२ तासांत उलगडा
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ३ आरोपींना बेड्या
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील पाटगाव येथील तरुण ज्ञानेश्वर उर्फ माउली राजेश उर्फ साहेबराव पाटील (वय २७) याच्या नृशंस हत्या प्रकरणाचा सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अवघ्या १२ तासांच्या आत यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना गडडोबा डोंगराजवळील डाकोबा खिंड परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे.
जुन्या भांडणाचा व किरकोळ वादाचा राग मनात धरून दिनांक ०८ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपींनी ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर लोखंडी कोयत्याने डोक्यात, मानेवर व हातावर प्राणघातक वार करून त्यांची निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणी मयताचे नातेवाईक सुशांत सुरेश पाटील (रा. खणभाग, फाटगाव, ता. मिरज) यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून बी.एन.एस. (BNS) कलम १०३(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अटक करण्यात आलेले आरोपीमध्ये अक्षय पांडुरंग माने (वय ३० वर्षे, रा. हनुमान मंदिराजवळ, योगेवाडी, ता. तासगाव, जि. सांगली), सर्वेष सूर्यकांत देशमुख (वय १९ वर्षे, रा. ग्रामपंचायतीजवळ, करोली (एम), ता. मिरज, जि. सांगली), विक्की उर्फ धनराज मधुसूदन पवार (वय २३ वर्षे, रा. वडर गल्ली, करोली (एम), ता. मिरज, जि. सांगली) असे आहेत.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे व पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, आरोपी गडडोबा डोंगराजवळील डाकोबा खिंड परिसरात लपून बसल्याची पक्की बातमी मिळाली. पोलिसांनी तात्काळ त्या भागात सापळा रचून तिन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.
यावेळी पोलिसांनी आरोपींकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. बेदराच्या दिवशी डोंगरवाडी येथे बैलगाडी शर्यत बघून परत येत असताना मयतासोबत झालेला वाद, तसेच करोली (एम) येथे झालेल्या मारहाणीचा किरकोळ राग मनात धरून, लोखंडी कोयत्याने वार करून हत्या केल्याचे त्यांनी सांगितले.
१४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यांना दिनांक १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत संकपाळ करत आहेत.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पो.नि. संजीव झाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. प्रशांत निशानदार, पो.उप.नि. महादेव पोवार, तसेच अंमलदार सुनील जाधव, अतुल माने, इम्रान मुल्ला, सुशील मस्के, सुरज थोरात आणि सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर असे कारवाई करणारे पोलीस पथक होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.