कुंभमेळ्याच्या कामात घोटाळा करणारा आरोपी नातेवाईक असल्याचं मंत्री गिरीश महाजनांनी केलं मान्य
नाशिक : खरा पंचनामा
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कामांशी संबंधित बनावट वर्क ऑर्डर तयार करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात मंत्री गिरीश महाजन यांचे नातेवाईक तनय महाजन याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.
कुंभमेळा प्राधिकरणाच्या अध्यक्षांची बनावट सही करून सुमारे 70 कोटी रुपयांच्या कामांचे कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. कुंभमेळ्याशी संबंधित विविध कामांच्या वर्क ऑर्डर मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
या प्रकरणात जामनेरमधील दोन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. तसेच या गुन्ह्यात आणखी पाच ते सात जणांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून त्यांचाही शोध घेतला जात आहे.
तनय महाजन याच्या कारवाईनंतर त्याचे वडील अनंत महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे, मंत्री गिरीश महाजन यांनीही या संपूर्ण प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडली. तनय महाजन हा माझा फार दूरचा नातेवाईक असल्याचे सांगतानाच त्याच्यावर यापूर्वीही विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
गिरीश महाजन म्हणाले की, कुंभमेळ्यातील कामे मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट वर्क ऑर्डर तयार करून फसवणूक करण्यात आली आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार असून यात नातेवाईक असो किंवा इतर कोणीही, कोणाचीही हयगय केली जाणार नाही. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर आणि कडक कारवाई करण्यात येईल.
या प्रकारची बनावट वर्क ऑर्डर केवळ या एका प्रकरणापुरती मर्यादित नसून इतर प्रकरणांतही अशाच प्रकारे गैरप्रकार झाले असण्याची शक्यता असल्याचेही महाजन यांनी नमूद केले. ही थेट फसवणूक असून यात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात आपण स्वतः तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, तनय महाजन हा या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचे बोलले जात असले तरी या गैरप्रकारात आणखी काही असल्याचे बोलले जात असले तरी या गैरप्रकारात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींनी या प्रकरणातून मोठ्या रकमा घेतल्याची माहिती समोर येत असल्याचेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासातून या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणातील आणखी कोणती नावे समोर येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.