जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याविरुद्ध ८२.८९ लाखांच्या अपसंपदा प्रकरणी गुन्हा दाखल
सांगलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा तब्बल ८२ लाख ८९ हजार ६४१ रुपये (८४.२३ टक्के) इतकी अफाट अपसंपदा भ्रष्ट मार्गाने जमवल्याप्रकरणी जिल्हा परिषद सांगलीचे सेवानिवृत्त कनिष्ठ लेखाधिकारी अण्णासाहेब मलगौंडा पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ. अंजली अण्णासाहेब पाटील यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई करत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली कडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अण्णासाहेब मलगौंडा पाटील (वय ६५ वर्ष, रा. सरस्वतीनगर, विश्रामबाग, सांगली) हे सांगली जिल्हा परिषदेत वर्ग-३ चे कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक रक्कम पतसंस्थेत गुंतवणूक केल्याची व करचुकवेगिरी केल्याची तक्रार पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांच्याकडे २८ ऑगस्ट २०१८ रोजी प्राप्त झाली होती.
या तक्रारीच्या आधारे आयकर अधिनियम व इतर नियमांनुसार सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत अण्णासाहेब पाटील यांच्या मालमत्तेची उघड चौकशी (Open Enquiry) करण्यात आली.
८४.२३% अधिक अपसंपदा उघड
दिनांक ०२/१२/१९९६ ते ३१/०५/२०२० या २३ वर्षांहून अधिक कालावधीतील त्यांच्या जमा-खर्चाचे व मालमत्तेचे परीक्षण (Check Period) करण्यात आले. या उघड चौकशीदरम्यान सेवानिवृत्त लोकसेवक अण्णासाहेब पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ. अंजली पाटील (वय ६० वर्षे, गृहिणी) यांनी आपापसात संगनमत करून ज्ञात उत्पन्नाच्या प्रमाणाशी विसंगत असलेली तब्बल ८२,८९,६४१ रुपये (+८४.२३%) इतकी अपसंपदा अप्रामाणिक व भ्रष्ट मार्गाने मिळवल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक योगेश रमेश चव्हाण यांच्या तक्रारीवरून आरोपींवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याची कलमे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम १३(१)(ई) सहवाचन १३(२), भ्रष्टाचार प्रतिबंध सुधारित अधिनियम २०१८ चे कलम १३(१)(ब) सह १३(२) आणि भारतीय दंड संहिता कलम १०९ अशी असून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम ३५(३) अन्वये दिनांक ०४/०८/२०२६ रोजी आरोपींना हजर राहण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक यास्मिन इनामदार (ACB सांगली) यांच्या पथकाने केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.