VIP दर्शनावरून मंदिरात राडा; आमदाराच्या मुलीने महिला PSI च्या कानशिलात लगावली, प्रत्युत्तरात पोलिसानेही उगारला हात
मंड्या : खरा पंचनामा
कर्नाटकातील श्रीरंगपट्टण येथील आरती उक्कडा मंदिरात VIP दर्शनावरून आमदाराच्या मुलीचा आणि महिला PSIचा वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास भीम अमावस्येच्या उत्सवादरम्यान हा प्रकार घडला.
मंदिराच्या गर्भगृहात रांगेत न थांबता प्रवेश करण्यावरून वाद सुरू झाल्यानंतर आमदाराच्या मुलीने महिला PSIच्या कानशिलात लगावल्याचे, तर प्रत्युत्तरात पोलिसानेही हात उगारल्याचे CCTV फुटेजमध्ये दिसत आहे. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मंड्या येथील महिला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या PSI सविता बी. पाटील यांची मंदिरातील बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली होती. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ऐश्वर्या काही जणांसोबत मंदिरात आल्या. रांगेत न थांबता गर्भगृहात प्रवेश करण्यावरून त्यांचा सविता यांच्याशी वाद झाला.
समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ऐश्वर्या आणि सविता यांच्यात वाद होताना दिसत आहे. ऐश्वर्या फोनवर बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचेही फुटेजमध्ये दिसते. त्यानंतर ऐश्वर्याने सविता यांना कानशिलात लगावल्याचे, तर प्रत्युत्तरात सविता यांनीही तिला मारल्याचे दिसून येते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी हस्तक्षेप करून दोघींना शांत करण्याचा प्रयत्न केला.
सविता यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ऐश्वर्याने आपण आमदारांची मुलगी असल्याचे सांगत आपल्याला का रोखले जात आहे, असा सवाल केला. त्यानंतर शिवीगाळ करून कानशिलात लगावली आणि आपल्या नोकरीवर परिणाम करण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला. या तक्रारीवरून पोलिसांनी ऐश्वर्याविरोधात सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, साधी दुखापत, जाणीवपूर्वक अपमान आणि गुन्हेगारी धमकी यांसह भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार एफआयआर दाखल केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.