एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई ! जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख अन् आमदारपुत्रासह 7 नेत्यांची थेट हकालपट्टी
पुणे : खरा पंचनामा
पालघर येथील रेल्वे हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर शिवसेना पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या 7 पदाधिकाऱ्यांना पक्षातून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
यामध्ये शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शहरप्रमुख राहुल घरत आणि आमदार राजेंद्र गावित यांचे सुपुत्र रोहित गावित यांच्यासारख्या प्रमुख नावांचा समावेश आहे.
सोशल मीडियावर या मारहाणीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यामध्ये शहरप्रमुख राहुल घरत कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावताना दिसत आहेत. या व्हिडिओची गांभीर्याने दखल घेत पालघर पोलिसांनी तातडीने पावले उचलली आणि राहुल घरत यांना अटक केली. याप्रकरणी कुंदन संखे आणि राहुल घरत यांच्यासह एकूण 17 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या पोलीस उर्वरित 16 संशयितांची सखोल चौकशी करत असून लवकरच पुढील कायदेशीर पावले उचलली जातील.
या दुर्दैवी घटनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी सांगितले की, "अशा हिंसाचाराचे पक्ष कधीही समर्थन करणार नाही. दोषींवर कडक कारवाई केली जाईल." त्यांच्या या इशाऱ्यानंतर काही वेळातच पक्षाने 7 जणांच्या निलंबनाचा आदेश जारी केला.
पक्षाने घेतलेली ही कठोर भूमिका आणि पोलिसांची सुरू असलेली कारवाई यामुळे पालघरच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे मुख्य आरोपीवर कायदेशीर कारवाई सुरू असताना, दुसरीकडे पक्षाच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये शिस्तीचा मोठा संदेश गेला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.