Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बेकायदा साउंड आणि लेझर सिस्टीमवर 'BIS' कायद्यानुसार कारवाई करा ॲड. ध्यानंजय मद्वाण्णा यांची मागणी

बेकायदा साउंड आणि लेझर सिस्टीमवर 'BIS' कायद्यानुसार कारवाई करा
 ॲड. ध्यानंजय मद्वाण्णा यांची मागणी

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सार्वजनिक कार्यक्रम आणि उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या बेकायदा साउंड सिस्टीम आणि डोळ्यांना गंभीर इजा पोहोचवणाऱ्या लेझर लाईट सिस्टीमवर 'ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स' (BIS) कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी ग्राहक चळवळीचे कार्यकर्ते ॲड. ध्यानंजय मद्वाण्णा यांनी केली आहे. कोणत्याही प्रकारची साउंड सिस्टीम अथवा लेझर लाईट सिस्टीम तयार करणे, त्यांची जोडणी करणे किंवा विक्री करण्यापूर्वी उत्पादक आणि विक्रेत्याने बीआयएस कडून अधिकृत परवाना घेणे कायद्याने बंधनकारक आहे.

सध्या बाजारात अनेक स्पीकर, ॲम्प्लिफायर आणि मिक्सर एकत्र (सीरिजमध्ये) जोडून प्रचंड आवाजाच्या उच्च डेसिबल क्षमतेच्या नवीन डीजे सिस्टीम तयार करून विकल्या जात आहेत. अशा सिस्टीम्स बीआयएसने घालून दिलेल्या मानकांमध्ये आणि गुणवत्ता चाचण्यांमध्ये पास होऊ शकत नसल्याने त्यांना परवाना मिळणे शक्यच नसते. त्यामुळे अशा परवानारहित सिस्टीम्स तयार करणे आणि विकणे पूर्णपणे कायदेशीर गुन्ह्याच्या कक्षेत येते.

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या बीआयएस कायदा २०१६ नुसार या राष्ट्रीय मानक संस्थेला केवळ वस्तू व सेवांची मानके ठरवण्याचेच नव्हे, तर तपासणी करणे, बेकायदा साहित्यावर धाडी टाकून ते जप्त करणे आणि दोषी उत्पादक व विक्रेत्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. मानवी आरोग्यास आणि डोळ्यांना धोका पोहोचवणारे लेझर लाईट व ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणारे बेकायदा डीजे साहित्य जप्त करण्याची कायदेशीर तरतूद यात आहे. तथापि, बीआयएसकडे असणारे अपुरे मनुष्यबळ, पोलीस प्रशासनाला या कायद्याबाबत असलेल्या माहितीचा अभाव आणि प्रत्येक जिल्ह्यात बीआयएसची कार्यालये उपलब्ध नसल्यामुळे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्यावरील दुष्परिणाम रोखण्यासाठी प्रशासनाने व पोलिसांनी बीआयएस कायद्याची योग्य माहिती घेऊन या बेकायदा सिस्टीम उत्पादक व विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करण्याची गरज असल्याचे ॲड. ध्यानंजय मद्वाण्णा यांनी स्पष्ट केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.