Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जत तालुक्यात तामिळनाडूच्या व्यापाऱ्यांवर सशस्त्र दरोडाबंदुकीचा धाक दाखवून ३० लाखांचा मुद्देमाल लांबवला

जत तालुक्यात तामिळनाडूच्या व्यापाऱ्यांवर सशस्त्र दरोडा
बंदुकीचा धाक दाखवून ३० लाखांचा मुद्देमाल लांबवला

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदीजवळील भिवर्गी फाटा येथे मध्यरात्रीच्या सुमारास एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटना घडली आहे. माडग्याळ येथील प्रसिद्ध मेंढ्यांच्या बाजारात व्यापारासाठी तामिळनाडूमधून आलेल्या व्यापाऱ्यांवर अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या सहा ते आठ दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून १० व्यापाऱ्यांना लुटले असून या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

तामिळनाडूतील सालेम येथून हे व्यापारी भिवर्गी फाटा परिसरात पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास पोहोचले होते. माडग्याळ येथील मेंढ्यांच्या बाजारात खरेदी-विक्रीसाठी जात असतानाच अचानक दरोडेखोरांनी त्यांची गाडी अडवली. दरोडेखोरांनी बंदुकीचा आणि शस्त्रांचा धाक दाखवून व्यापाऱ्यांकडील २० लाखांची रोकड, दोन तोळे सोने आणि मोबाईल फोन असा एकूण सुमारे ३० लाखांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि क्षणार्धात पोबारा केला.
घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. संशयित आरोपींचा माग काढण्यासाठी विविध दिशांना विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी सर्व बाजूंनी नाकाबंदी करण्यात आली असून आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पुढील तपास करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.