Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सराईत गुन्हेगार १ वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपारकायदा व सुव्यवस्थेसाठी सांगली शहर पोलिसांचे मोठे पाऊल

सराईत गुन्हेगार १ वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार
कायदा व सुव्यवस्थेसाठी सांगली शहर पोलिसांचे मोठे पाऊल

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सांगली पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत सांगली शहर आणि संजयनगर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार अंकुश आनंदराव केरीपाळे (रा. पाण्याच्या टाकीजवळ, रविवार पेठ, माधवनगर, सांगली) याला संपूर्ण सांगली जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार केले आहे.

पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अंकुश केरीपाळे याच्यावर सन २०१५ पासून विनयभंग, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी), सरकारी नोकरावर हल्ला आणि घरफोडी यांसारखे विविध गंभीर गुन्हे सांगली शहर व संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद आहेत. त्याच्या सततच्या गुन्हेगारी कारवायांमुळे सांगली शहर व संजयनगर परिसरातील सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. सार्वजनिक शांतता टिकवून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी मिरज यांच्याकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ (अ) (ब) नुसार सदर गुन्हेगाराला हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.

 प्रस्तावावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी अंकुश केरीपाळे यास एका वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. या आदेशाची बजावणी १५ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आली असून, दिलेल्या ४८ तासांच्या मुदतीनंतर त्याला जिल्ह्यातून बाहेर घालवण्यात आले आहे.

सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत आणि पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष यादव, पोलीस अंमलदार शिंदे, ननवरे, कांबळे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे तांबोळी यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.