Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षे सक्तमजुरी अन् ५० हजारांचा दंड

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षे सक्तमजुरी अन् ५० हजारांचा दंड

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला सांगली येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत चार वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जगदीश सुभाष चव्हाण (वय २५, रा. डफळापूर, ता. जत, जि. सांगली) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सांगली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती जे. ए. मोहंती यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी पार पडली.

न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ८ अन्वये दोषी धरून प्रत्येकी चार वर्षांची शिक्षा, तसेच पोक्सो कलम १२ अंतर्गत तीन वर्षांची शिक्षा आणि एकूण ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

घटनेची सविस्तर माहिती अशी की, आरोपी जगदीश चव्हाण हा पीडित मुलीच्या घराजवळ राहत होता. तिचा विश्वास संपादन करून, मुलगी अंगणात खेळत असताना बाजूचे घर पाहण्यास जाण्याचे सांगून त्याने तिला आपल्या घरी नेले व तेथे तिचा विनयभंग केला. पीडितेने आरडाओरड करत घरातून पळ काढला आणि संपूर्ण प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी जत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान इतर साक्षीदारांनी दबावाखाली साक्ष देणे टाळले असले, तरी पीडित मुलीने न्यायालयात शपथेवर दिलेली साक्ष आणि विश्वासाहर्य पुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरला. त्या आधारे न्यायालयाने आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता व्ही. के. मुरचिटे, ए. एम. साटविलकर व एस. आर. हिंगमिरे यांनी काम पाहिले. या न्यायालयीन कामकाजात पैरवी कक्ष अधिकारी मुद्दस्सर शेख (सहा. पो.नि.), पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम बंडगर आणि महिला कॉन्स्टेबल रेखा शेळके यांनी सहकार्य केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.