Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वडिलांवर हल्ला, लेक बचावाला धावली; हल्लेखोरांनी दोघांना संपवलं, भाऊबंदकीतून ग्राम पंचायतीत थरार

वडिलांवर हल्ला, लेक बचावाला धावली; हल्लेखोरांनी दोघांना संपवलं, भाऊबंदकीतून ग्राम पंचायतीत थरार

बंगळुरू : खरा पंचनामा 

ग्राम पंचायत कार्यालयात बाप-लेकीला निघृणपणे संपवण्यात आलं. बेळगाव जिल्ह्यातील कित्तुर तालुक्यामधील अवराडी गावात ही घटना घडली. मृतांची ओळख पटली आहे. रुद्रप्पा कुंदरगी (६७) आणि शशिकला कुंदरगी (२६) अशी दोघांची नावं आहेत. रुद्रप्पा कुंदरगी माजी सैनिक आहेत.

रुद्रप्पा कुंदरगी मालमत्तेशी वादाची कागदपत्रं जमा करण्यासाठी आणि आरटीसी रेकॉर्डमध्ये स्वतः नाव नोंदवण्यासाठी ग्राम पंचायत कार्यालयात पोहोचले आहेत. त्याचवेळी त्यांचे भाऊ बसप्पा कुंदरगी, संगप्पा कुंदरगी आणि पुतण्या मदिवलप्पा कुंदरगी यांनी त्यांच्यावर कोयता आणि अन्य धारदार शस्त्रांनी हल्ला केला.

रुद्रप्पा यांच्यावर हल्ला होत असल्याचं पाहून त्यांची लेक शशिकला बचावासाठी धावली. त्यावेळी हल्लेखोरांनी तिच्यावरही हल्ला केला. तिच्या डोक्यावर दगडानं मारहाण करण्यात आली. यावेळी तिचे केस कापण्यात आले. यावेळचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आहे. बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला.

बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १२ च्या सुमारास अवराडी ग्राम पंचायतीच्या कार्यालयात ही घटना घडली. त्यावेळी पंचायत विकास अधिकाऱ्यांसह अन्य सरकारी कर्मचारी तिथे उपस्थित होते. त्यांनी ही घटना घडताना पाहिली. काहींनी घटनेचा व्हिडीओ चित्रित केला. पोलिसांकडे या घटनेचे व्हिडीओ पुरावे गोळा केले आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस उपनिरीक्षक, कित्तूर सीपीआय, बैलहोंगलचे डीसीपींसह पोलिसांचं पथक १ वाजता घटनास्थळी पोहोचलं. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. पोलिसांनी दोघांचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. हल्ल्यात रुद्रप्पा यांच्या कार चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३८ गुंठे जमिनीवरून वाद होता. न्यायालयानं ही जमीन तीन जणांमध्ये वाटण्याचे आदेश दिले होते. धारवाडमध्ये स्थायिक झालेल्या रुद्रप्पा यांचा जमिनीत कोणताही हिस्सा नसल्याचा त्यांच्या भावांचा दावा होता. तर या मालमत्तेत आपल्यालाही वाटा मिळायला हवा, अशी रुद्रप्पा यांची भूमिका होती.

रुद्रप्पा यांनी त्यांच्या जमिनीच्या हिश्श्यावरून न्यायालयाचा आदेश मिळवला. या आदेशाची कायदेशीर अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू होते. न्यायालयाचा आदेश लागू झाल्यास रुद्रप्पा यांना त्यांचा हिस्सा मिळेल, अशी भीती त्यांच्या भावांना वाटत होती. याच वादातून रुद्रप्पा यांची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.