साहिल वाकोडेबरोबर परीक्षा केंद्रात नेमकं काय घडलं? पोलिसांच्या हाती लागले महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज
मुंबई : खरा पंचनामा
आयआयटी मुंबईत द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याने आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. परीक्षेत चॅटजीपीटीचा वापर करताना पकडले गेल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. दरम्यान, कॉपी करताना पकडले गेल्यानंतर या विद्यार्थ्याला वर्गातून बाहेर काढतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. दुपारी साडेबारा ते पावणे एक या वेळेतील या फुटेजमध्ये प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला हे विद्यार्थ्याला परीक्षा गृहातून बाहेर जाण्यास सांगत असल्याचं वरवर दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या तपासात अत्यंत महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे.
सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) धरमवीर बनसोड यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेचे पथक या फुटेजचे सखोल विश्लेषण करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “आयआयटी कॅम्पसमधील वर्गखोल्या आणि लॉबीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, यामध्ये परीक्षा गृहात घडलेली ही घटना कैद झाली आहे. दुपारी १ वाजता पेपर संपण्यापूर्वी अवघ्या काही मिनिटांआधी, म्हणजेच साडेबारा ते पावणे एकच्या दरम्यान, संबंधित विद्यार्थी थोडा वाकून आपल्या खिशातील काहीतरी न्याहाळत असल्याचं फुटेजमध्ये दिसत आहे. प्राध्यापक त्याला याचबाबात प्रश्न विचारत असल्याचंही फुटेजमध्ये दिसून येत आहे. त्यानंतर ते त्याला इतर विद्यार्थ्यांपासून दूर एका बाजूला घेऊन जातात."
सूत्राने पुढे सांगितलं की, यानंतर वाकोडे परीक्षा गृहाच्या बाहेर दिसला आणि लॉबीतील सीसीटीव्ही फुटेजनुसार, दुपारी साधारण १ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास त्याने आपल्या हॉस्टेलच्या खोलीत प्रवेश केला. "त्यानंतर तो मुलगा खोलीबाहेर पडलाच नाही आणि नंतर त्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं", असं सूत्राने सांगितलं.
सोमवारी, बनसोड यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेच्या पथकाने वाकोडेच्या हॉस्टेलच्या खोलीची झडती घेतली आणि पंचनामा केला. "आयआयटीमधील आत्महत्येच्या एका जुन्या प्रकरणात स्थानिक पोलिसांना सुसाईड नोट सापडली नव्हती, जी नंतर खोलीतील एका पुस्तकातून जप्त करण्यात आली होती. यावेळी तसं काही होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. आतापर्यंत कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही", असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. अधिकाऱ्याने पुढे सांगितलं की, अद्याप कोणालाही समन्स बजावण्यात आलेले नाही आणि तपासाच्या सुरुवातीच्या दिवसांत हे पथक पवई पोलिसांकडून सर्व कागदपत्रे गोळा करेल, जिथे सुरुवातीला एफआयआर नोंदवण्यात आला होता.
"आम्ही त्याच्या खोलीतील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर संबंधित साहित्यही ताब्यात घेतलं आहे", असंही अधिकाऱ्याने सांगितलं. पवई पोलिसांकडून हे प्रकरण हस्तांतरित झाल्यानंतर गुन्हे शाखा आयआयटी बॉम्बे विद्यार्थी आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करेल. यापूर्वी, पवई पोलिसांनी साहिलचे वडील रवींद्र यांच्या तक्रारीवरून प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला आणि इतरांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवला होता. आपल्या तक्रारीत रवींद्र यांनी असा आरोप केला आहे की, डुल्ला हे आयआयटी-बॉम्बेच्या संचालकांच्या सांगण्यावरून गेल्या तीन महिन्यांपासून साहिलसोबत जातीवर आधारित भेदभाव करत होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.