ममता बॅनर्जीना दुसरा मोठा धक्का; नंदिग्रामनंतर आता रेजीनगरच्या उमेदवाराचीही पोटनिवडणुकीतून माघार, पश्चिम बंगालमध्ये घडामोडींना वेग
कोलकाता : खरा पंचनामा
पश्चिम बंगालच्या राजकारणात मागील काही महिन्यांपासून मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली होती. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं आणि दोन्ही गटाला नवं नाव आणि चिन्ह देण्यात आलं आहे. यातच पश्चिम बंगालमध्ये सध्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीतही ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे.
ममता बॅनर्जी यांनी नंदिग्रामच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिलेल्या संचिता प्रधान यांनी या पोटनिवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. त्यानंतर नंदिग्राममध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला. त्यानंतर आज (१९ सप्टेंबर) पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली आहे.
नंदिग्रामनंतर आता रेजीनगरमधील उमेदवार रबीउल आलम चौधरी यांनीही या पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
वृत्तानुसार, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाने रेजीनगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिलेले रबीउल आलम चौधरी यांनी शनिवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचं जाहीर केलं आहे. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघासाठी संचिता प्रधान यांनी माघार घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली आहे.
ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केल्यानंतरच आपण उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं रबीउल आलम चौधरी यांनी सांगितलं. टीएमसीचं नाव आणि चिन्हाबाबत सुरू असलेला कायदेशीर वाद, तसेच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाबरोबर निष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांना धमकावलं जात असल्याचा आरोप, या सर्व गोष्टींचा प्रभाव असल्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचं चौधरी यांनी सांगितलं.
"सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आता आम्हाला एका नवीन चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. आमच्या कार्यकर्त्यांचा छळ केला जात आहे. त्यांना धमकावलं जात आहे आणि अटकही केली जात आहे. आम्ही त्यांना संरक्षण देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आम्ही निवडणूक कशी लढवू शकतो? त्यामुळे मी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली आणि जे योग्य असेल तेच करावं असं मला त्यांनी सांगितलं", अशी प्रतिक्रिया चौधरी यांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.