पोलिसांना घामावरून ओळखलं, पबमध्ये दीड लाख उधळले; 'समृद्धी' दरोडा मास्टरमाइंडचा नवा कारनामा समोर
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर झालेल्या दरोडा प्रकरणाने एकच खळबळ उडाली होती. समृद्धी महामार्गावर दोन ठिकाणी झालेल्या या धक्कादायक प्रकाराने पोलिसांसह सगळीच यंत्रणा हादरली होती. समृद्धी महामार्ग दरोडा प्रकरणातील दोन आरोपींना थेट ११७१ किमीवरून पोलिसांनी उचललं. दिल्लीतून या दरोड्याच्या मास्टरमाइंडच्या मुसक्या आवळल्या. या मास्टरमाइंडबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
समृद्धी महामार्गावर राहुरीतील एका तरुण उद्योजकाला भरदिवसा अडवून लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठे यश आले. या टोळीचा मुख्य सूत्रधार आणि मास्टरमाईंड परशुराम गायकवाड याला पोलिसांनी थेट दिल्लीत छोले-भटुरेवर ताव मारताना उचललं.
समृद्धी महामार्गावर उद्योजकाला लुटल्यानंतर दरोडेखोर पसार झाले. टोळीतले इतर दरोडेखोर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी लपले. तर, मास्टरमाइंड परशुराम हा आपल्या एका साथीदारासह दिल्लीत पोहचला. परशुरामने दिल्लीत एकाच रात्रीत पबमध्ये दीड लाख रुपये उधळले असल्याची माहिती समोर आली.
दिल्लीत परशुरामला पकडण्यासाठी गेलेले छत्रपती संभाजीनगर पोलिसांचे पथक साध्या वेशात होते. मात्र, आरोपींचा पोलिसांच्या कार्यपद्धतीचा आणि मानवी स्वभावाचा मोठा अभ्यास होता. त्याच्या मागावर तीन पोलीस होते. दिल्लीच्या वातावरणात तीन जणांना सारखा घाम येत असल्याचे परशुरामच्या लक्षात आले. या तिघांची देहबोली आणि घाम यामुळे ते महाराष्ट्रातील असल्याचे आरोपीनी ताडले. मात्र, तो पळून जाण्याच्या किंवा सावध होण्याच्या विचारात असतानाच साध्या वेशातील पोलिसांनी त्याला झडप घालून ताब्यात घेतले.
दैनिक दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, तपासातील माहितीनुसार, मुख्य आरोपी परशुराम गायकवाड याने गावाकडील घराच्या आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारले होते. या कॅमेऱ्यांचे थेट अॅक्सेस त्याच्या मोबाईलवर होते. त्यामुळे गावात कोणताही अनोळखी व्यक्ती किंवा पोलीस आल्यास त्याला तात्काळ माहिती मिळायची. याशिवाय बीडमधील एका कॉलनीत या टोळीचा वावर असायचा, जिथे पोलीस तपासासाठी गेल्यावर स्थानिक महिला आणि नागरिक पोलिसांवर दगडफेक करायचे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.