Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करत तिघांना अटकमिरज ग्रामीण पोलिसांची म्हैसाळमध्ये धडक कारवाई

सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करत तिघांना अटक
मिरज ग्रामीण पोलिसांची म्हैसाळमध्ये धडक कारवाई

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एस.टी. स्टँड परिसरातील एका पानपट्टीवर धाड टाकून मिरज ग्रामीण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुगंधी तंबाखू व माव्याचा अवैध साठा जप्त केला आहे. या धडक कारवाईत संयुक्त पथकाने २० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून तीन आरोपींना अटक केली आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजित कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण पोलिसांचे पथक म्हैसाळ हद्दीत गस्त घालत असताना 'हॉटेल वैभव' जवळील 'अविनाश पान शॉप'मध्ये अवैध सुगंधी तंबाखूची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. 

या बातमीची खात्री पटल्यानंतर पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या सूचनेनुसार अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अनिल पवार आणि प्रणव जिनगर यांना बोलावून पानपट्टीची झडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान ५०० ग्रॅम तयार मावा तसेच विविध पाऊचमध्ये असलेला एकूण २० किलो सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला.

या कारवाईत पानपट्टी चालक तानाजी अण्णासो दबडे (वय ३६, रा. कागवाड, जि. बेळगाव), पानपट्टी मालक अविनाश अशोक शिंदे (वय ४८, रा. म्हैसाळ, ता. मिरज) आणि विशाल शशिकांत पिंपळे (वय ४४, रा. इचलकरंजी, ता. हातकणगले, जि. कोल्हापूर) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात आरोपींनी हा प्रतिबंधित साठा कर्नाटकातून खरेदी केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार यांच्या फिर्यादीवरून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात बी.एन.एस. आणि अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने तिन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत संकपाळ करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.