मुंबईला जायचं फायनल ! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान
जालना : खरा पंचनामा
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यानं मुंबईला जाणारच यावर मनोज जरांगे पाटील ठाम झाले आहेत. त्यासाठी अंतरवाली सराटी इथं आज मराठा बांधवांसोबत झालेल्या बैठकीनंतर जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा मार्ग, दिवस आणि नियोजन याची माहिती दिली.
मुंबईतील आंदोलन कसं असेल, कुठून जायचं याचं सविस्तर नियोजन जरांगे पाटील यांनी सांगितलं. आपण सर्वांनी एकाच मार्गाने एकजुटीने मुंबईला जायचं असल्याचं जरांगे म्हणाले. शांततेत आंदोलन करायचं असल्याचंही जरांगे पाटलांनी यावेळी सांगितलं.
मराठा आंदोलकांनी मुंबईच्या दिशेनं कूच केल्यानंतर पहिला मुक्काम बीडच्या पाटोदा इथं असणार आहे. तर दुसऱ्या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा इथं दुसरा मुक्काम असेल अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. मुंबईला गाड्यांनी जायचं असलं तरी मराठ्यांना एका दिवसात शक्य नाही. वाटेत मुक्काम पडणारच असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं.
पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्यातून जात नसल्यानं नाराजी होती. ती नाराजी दूर करण्यासाठी यावेळी मार्ग वळवल्याचंही जरांगे पाटील यांनी सांगितलं. पुण्यात हडपसरला तिसरा मुक्काम असणार आहे. चौथ्या मुक्कामाचे ठिकाण अद्याप ठरलेलं नाही. त्यासाठी दोन ठिकाणांची चर्चा सुरू आहे. खोपोली की कोपरखैरणे यावर शिक्कामोर्तब व्हायचं असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले.
जे मराठे मुंबईला येणार नाहीत त्यांनी चाललेल्या मार्गावरून आम्हाला आशीर्वाद द्यायला या. ज्या वाटेवरून आम्ही जाणार आहोत त्या रस्त्यावर मराठा बांधवांची सोय करा. मुंबईला न येणाऱ्या मराठ्यांनी फक्त चाललेल्या रस्त्यावर आशीर्वाद देऊन गावाला जावं. एक दिवस जातीसाठी द्यावा. काम, नोकरी, व्यवसाय त्या दिवशी बंद ठेवा आणि तिथं या.
चार चाकी गाड्या असलेल्या मराठ्यांनी आम्हाला मुंबईला सोडून परत यावं. आम्ही तुमच्या लेकरांसाठी भांडतो. तुमची गाडी घरी उभा करू नका. मुंबईला जे पोरं गाड्या घेऊन चाललेत त्यांनी मुंबईला वेशीपर्यंत सोडायला या. तिथून आम्ही आझाद मैदानाला पुढं जातो असं आवाहन जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना केली.
गाडी रस्त्यावर लावायची आणि खाली चटई टाकून झोपायचं. कुणी अडवलं की दुसरीकडून रस्ता शोधून जायचं. ताकद वापरायची नाही. जेव्हा गरज पडेल तेव्हा वापरू. आता डोक्याने जायचं. शांततेचा मार्ग सोडायचा नाही असंही जरांगेंनी स्पष्ट सांगितलं.
देवेंद्र फडणवीस साहेब अडवू नका आणि अडवणार नाहीत हेही माहितीय. त्यांनी अडवलं तर मराठ्यांचं मतदान तुटल्याशिवाय राहणार नाही. रस्त्याने पोलीस अडवणार नाहीत. मुंबईतसुद्धा अडवणार नाहीत हे खात्रीपूर्वक मी सांगू शकतो असं जरांगे म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.