मतिमंद व मूकबधिर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
सांगली जिल्हा न्यायालयाचा निर्णय
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश जे. ए. मोहंती यांनी मतिमंद आणि मूकबधिर तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अर्जुन सर्जेराव लोखंडे (वय २५, रा. थबडेवाडी रोड, कवठेमहांकाळ) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात न्यायालयाने आरोपीला भा.दं.वि. कलम ३७६ (२) (एल) अन्वये दोषी ठरवत जन्मठेप व २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद, तसेच कलम ४५० अंतर्गत १० वर्षे सक्तमजुरीचा कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची ही रक्कम पीडितेला देण्याचे आदेश देण्यात आले असून, तिला शासनाकडूनही स्वतंत्रपणे नुकसान भरपाई मागता येईल.
ऑगस्ट 2020 मध्ये पीडित मुलगी घरात एकटी असताना आरोपी अर्जुन लोखंडे याने तिच्या असहायतेचा आणि अपंगत्वाचा गैरफायदा घेऊन अत्याचार केला. पीडितेच्या आईने घटनास्थळी पोहोचून आरोपीला पकडले आणि नागरिकांच्या मदतीने पोलिसांच्या हवाली केले. कवठेमहांकाळ पोलिसांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण १७ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये पीडितेच्या आईची साक्ष, मुलीच्या शारीरिक सक्षमतेबाबत व अत्याचाराबाबत ८ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अभिप्राय आणि तपास अधिकाऱ्यांचे पुरावे गुन्हा सिद्ध करण्यासाठी मोलाचे ठरले.
एका निष्पाप आणि अपंग तरुणीवर केलेला हा अत्याचार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून आरोपीवर दया दाखवण्यासारखी कोणतीही बाजू नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अनिलकुमार नागेशराव कुलकर्णी यांनी काम पाहिले. तसेच कवठेमहांकाळ पोलीस ठाणे व पैरवी कक्षाच्या पथकाने या तपासात आणि न्यायालयीन कामकाजात महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.