१ कोटींचे ४०० गहाळ मोबाईल शोधून मूळ मालकांना केले परत
कोल्हापुरात पोलिसांची मोठी कामगिरी
पूजा फडके
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर जिल्हा सायबर पोलीस ठाणे आणि जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांनी संयुक्तपणे मोठी यशस्वी कारवाई करत गेल्या एका महिन्यात नागरिकांचे हरवलेले तब्बल ४०० मोबाईल फोन शोधून काढले आहेत. या हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल संचांची एकूण किंमत सुमारे १ कोटी २५ हजार रुपये इतकी आहे. आज ३ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित एका कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून हे मोबाईल अधिकृतपणे त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. आपले हरवलेले मोबाईल पुन्हा मिळतील अशी आशा सोडून दिलेल्या नागरिकांना जेव्हा फोन परत मिळाले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद आणि समाधान दिसून आले.
या शोधमोहिमेसाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार सायबर पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. संबंधित मोबाईल कंपन्यांशी संपर्क साधून केंद्र सरकारच्या सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. सायबर पोलिसांच्या निरनिराळ्या पथकांनी मागील एका महिन्यात तपास करून केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर शेजारच्या कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यांमधूनही हे ४०० मोबाईल संच शोधून ताब्यात घेतले.
अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे, पोलीस उपनिरीक्षक अतिष म्हेत्रे, सहाय्यक फौजदार राजू ताटे, मिनाक्षी पाटील आणि संपूर्ण पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या कामगिरीबद्दल संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले असून, भविष्यातही सायबर तपासाच्या आधारे नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल शोधून त्यांना परत करण्याची ही मोहीम सातत्याने राबवली जाईल असे स्पष्ट केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.