Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बेनामी शेल कंपनीच्या नावावर म्युल बँक खाती उघडून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाशकोल्हापूर सायबर पोलिसांची मोठी कारवाई; २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

बेनामी शेल कंपनीच्या नावावर म्युल बँक खाती उघडून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
कोल्हापूर सायबर पोलिसांची मोठी कारवाई; २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

पूजा फडके 
कोल्हापूर : खरा पंचनामा 

कोल्हापूर सायबर पोलिसांनी म्युल बँक खात्यांच्या (बेनेफिशअरी बँक खाती) माध्यमातून चालणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य सायबर गुन्हेगारी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सायबर गुन्हेगार नागरिकांची दिशाभूल करून अथवा पैशांचे आमिष दाखवून बँक खाती भाड्याने घेतात आणि फसवणुकीची रक्कम त्यात वळती करतात. अशा म्युल बँक खात्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबवण्यात येत होती. या मोहिमेदरम्यान मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे आणि त्यांच्या पथकाने शाहूपुरी येथील एका संशयित कार्यालयावर छापा टाकून ही धडक कारवाई केली.

शाहूपुरी ४ थी गल्लीतील स्वास्तिक प्लाझा येथे असलेल्या 'टोरकोलाईन पॉवर टूल्स प्रा. लि.' या कंपनीच्या कार्यालयावर मारलेल्या छाप्यात पोलिसांना तीन संशयित इसम मिळून आले. नितीश कुमार दहिया (वय २१, रा. हरयाणा), अनुप यादव (वय २८, रा. राजस्थान) आणि अमित यादव (वय २८, रा. हरयाणा) अशी या आरोपींची नावे आहेत. चौकशीदरम्यान त्यांनी त्यांचा साथीदार करमवीर उर्फ विजेंद्र सिंह (रा. राजस्थान) याच्या मदतीने भारत सरकारच्या उद्यम नोंदणीवरून बनावट शेल कंपनी स्थापन केल्याची कबुली दिली. १ जुलै २०२६ पासून सुरू केलेल्या या बेनामी कंपनीच्या नावाने कोल्हापुरातील विविध बँकांमध्ये चालू (करंट) खाती उघडून सायबर फसवणुकीतील रकमा वळत्या करून त्यावर टक्केवारी मिळवली जात होती.

छाप्यादरम्यान आरोपींच्या मोबाईल तपासणीत रिमोट ॲक्सेसद्वारे पैसे वळवण्यासाठी वापरण्यात येणारा APK फाईलचा मेकॅनिझम आणि संशयास्पद चॅटिंग आढळून आले. पोलिसांना या ठिकाणाहून १४ विविध बँकांची चेकबुक्स, १० क्यूआर कोड, २ क्यूआर मशीन्स, रबरी स्टॅम्प, ७ डेबीट कार्ड्स, लॅपटॉप, बनावट पत्त्यांच्या आधारकार्डच्या प्रती, १ स्कॉर्पिओ गाडी आणि रोख नोंदी असलेली वही असा एकूण सुमारे २१ लाख रुपयांचा मुद्देमाल मिळाला आहे.

या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ६२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर पसार आरोपींचा शोध सुरू आहे. या यशस्वी कारवाईनंतर पोलिसांनी सामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही पैशांच्या वा कमिशनच्या आमिषाला बळी पडून आपले बँक खाते कोणालाही वापरण्यास किंवा भाड्याने देऊ नये.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.