सांगलीत डॉल्बीचा दणदणाट; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५ गणेश मंडळांवर सांगली पोलिसांची धडक कारवाई
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यात गणेशोत्सव २०२६ शांततेत आणि आनंददायी वातावरणात पार पडावा यासाठी सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास देशमुख यांनी डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. त्याअनुषंगाने सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व मंडळांना मर्यादेपेक्षा जास्त आवाज न वाढवण्याबाबत आणि सार्वजनिक उपद्रव न करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
मात्र, २० सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या ७ व्या दिवसाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत समर्थ चौकातील ७ मैत्रीचा गणेशोत्सव मंडळ, गणपती पेठेतील शिवराज्य ग्रुप कला व क्रीडा मंडळ, पत्रकारनगर येथील लोकमान्य कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, शामरावनगरचे सहारा गणेशोत्सव मंडळ आणि रामनगर येथील मोरया प्रतिष्ठान मंडळ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन केले. मिरवणुकीत डॉल्बी साऊंड सिस्टीमचा मोठ्या आवाजात वापर करून सार्वजनिक उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी या सर्व मंडळांचे अध्यक्ष, डॉल्बी मालक आणि ऑपरेटर यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विसर्जन मिरवणुकीत वापरण्यात आलेल्या डॉल्बी साऊंड सिस्टीमवर कायद्यानुसार पुढील कारवाई केली जात आहे. तसेच पुढील विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी पोलिसांच्या आदेशांचे पालन करावे आणि पारंपरिक वाद्यांचाच वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.