मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मराठा बांधव आक्रमक; बीड-जालनामध्ये जाळपोळ
जालना : खरा पंचनामा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असताना देखील सरकारकडून या आंदोलनाची दखल घेतली जात नाही. आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. त्यांनी बीड आणि जालनामध्ये रस्त्यावर उतरत आंदोलन केले आणि जाळपोळ केली. दोन्ही ठिकाणी तणावाचे वातावरण आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालवल्याने मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. जालन्यात मराठा समाज बांधव आक्रमक झाले असून टायर जाळून त्यांनी निषेध व्यक्त केला. जालना- जळगाव महामार्गवरील केदारखेडा या ठिकाणी मराठा समाज बांधवानी मध्यरात्री टायर जाळले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे मराठा समाज बांधवांचं म्हणणं आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनात मराठा बांधवांनी उद्या जालना जिल्हा बंदची हाक दिली आहे. सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याने मराठा बांधवांनी जिल्हा बंदची हाक दिली. सरकारने लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याची मागणी केली. तर दुसरीकडे बीडमध्ये देखील मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. बीड- जालना महामार्गावरती मराठा बांधवांनी टायर पेटवले.
बीड ते जालना या महामार्गावरती मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत टायर पेटवत रस्तारोको आंदोलन केले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रस्तारोको आंदोलन आणि टायर बाजूला हटवण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले असून शिष्टमंडळ का भेटायला आले नाही? हा रोष व्यक्त करत मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मराठा बांधवांनी निषेध व्यक्त केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.