राहुल गांधींचा एक फोन अन् काँग्रेसच्या माजी आमदारानं भाजपाची वाट सोडली; राहुल बोंद्रेच्या भाजप प्रवेशाला ब्रेक !
नागपूर : खरा पंचनामा
काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला होता. मात्र, राहुल गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेनंतर बोंद्रे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय मागे घेतल्याची चर्चा आहे.
चिखलीचे माजी आमदार आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही वर्षांपासून राजकीय वर्तुळात होती. २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीपासूनच त्यांच्या पक्षांतराच्या शक्यतेबाबत चर्चा सुरू होती. मात्र, चिखली मतदारसंघातील स्थानिक राजकीय समीकरणे आणि भाजपमधील अंतर्गत राजकारणामुळे हा प्रवेश प्रत्यक्षात आला नव्हता.
बोंद्रे यांनी अलीकडे माध्यमांमधून काँग्रेसमधील आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाचा उल्लेख करत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेस आणि भाजपच्या राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
चिखलीच्या विद्यमान भाजप आमदार श्वेता महाले आणि राहुल बोंद्रे यांच्यातील राजकीय संघर्ष जुना आहे. २०१९ आणि २०२४च्या विधानसभा निवडणुकीत दोघेही आमनेसामने होते. २०२४मध्ये श्वेता महाले यांनी बोंद्रे यांचा पराभव केला. त्यामुळे बोंद्रे यांना भाजपमध्ये प्रवेश देताना स्थानिक नेतृत्वाची भूमिका काय असेल, हा प्रश्न महत्त्वाचा मानला जात होता. भाजपच्या स्थानिक राजकारणात महाले दाम्पत्याचे महत्त्व लक्षात घेता त्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर त्यांच्या भूमिकेनंतरच बोंद्रे यांच्या प्रवेशाबाबत सकारात्मक वातावरण तयार झाल्याची चर्चा होती.
बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्येही हालचाली सुरू झाल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बोंद्रे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. या चर्चेनंतर बोंद्रे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय मागे घेतल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
बोंद्रे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यातील राजकीय जवळीकही या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. सपकाळ यांचा बुलढाणा हा गृहजिल्हा असल्याने बोंद्रे यांच्या निर्णयाकडे काँग्रेसच्या संघटनात्मक राजकारणाच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.