भाईंदर महासभेत राडा, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकारांना मारहाण; भाजपच्या 16 नगरसेवकांवर गुन्हा
मुंबई : खरा पंचनामा
मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत गोंधळ घालून प्रेक्षक गॅलरीतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या 16 नगरसेवकांच्या विरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान एका नगरसेविकेने केलेल्या तक्रारीनंतर सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सुनील यादव यांच्याही तक्रारीवरूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या राड्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाल्यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेच्या कामकाजात पारदर्शकता राहावी आणि नागरिकांना सभेतील चर्चेची माहिती मिळावी यासाठी महासभेचे ऑनलाइन थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली. मात्र प्रशासनाने सभागृहातील चित्रीकरणास मनाई केल्याने हा मुद्दा वादाचा केंद्रबिंदू ठरला. शुक्रवारी झालेल्या सभेला उपस्थित असलेले काही नागरिक मोबाईलद्वारे चित्रीकरण करून प्रतीकात्मक निषेध नोंदवत असताना सत्ताधारी भाजपचे काही नगरसेवक प्रेक्षक गॅलरीत आले. तिथे त्यांनी सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि पत्रकारांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्रकारांचे मोबाईल आणि कॅमेरे फोडले.
सामाजिक कार्यकर्ते करण पवार यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी भाजपचे नगरसेवक शानू गोहिल, तरुण शर्मा, रूपाली मोदी, प्रीती जैन, वंदना भावसार, हेतल परमार, विशाल पाटील, संजय थरथरे, नवीन सिंग, कविता त्रिपाठी, दीपिका अरोरा, महेश म्हात्रे, भरत कोठारी, हेमा बेलाणी, योगिता शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
एका महिला नगरसेविकेने दिलेल्या तक्रारीवरून सामाजिक कार्यकर्ते करण पवार, कृष्णा गुप्ता, मनसेचे सचिन पोपळे, रॉबर्ट डिसोझा आणि सतीश गुप्ता यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन गुन्हे दाखल झालेले असताना महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सुनील यादव यांनीही पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.