Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'फ्रेंडशिप फाईलमधलं बोलणं म्हणजे लोकशाहीचा खून आणि बलात्कारच'; राज ठाकरेंची खरमरीत शब्दात टीका

'फ्रेंडशिप फाईलमधलं बोलणं म्हणजे लोकशाहीचा खून आणि बलात्कारच'; राज ठाकरेंची खरमरीत शब्दात टीका

मुंबई : खरा पंचनामा 

'राज्यात सध्या एक फ्रेंडशिप फाईल व्हायरल झाली आहे. सत्ताधारी पक्षांशी निगडीत मंडळीशी या क्लिपमधलं हे बोलणं म्हणजे लोकशाहीचा खून आणि बलात्कारच आहे', अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे.

राज यांनी यासंदर्भात सविस्तर पोस्टच लिहिली आहे.

राज लिहितात, 'सध्या महाराष्ट्रात एक 'फ्रेंडशिप फाईल' ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी, या पक्षाच्या सोशल मीडियात महत्वाची भूमिका बजावणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आणि स्वतःला निष्पक्ष राजकीय विश्लेषक म्हणवणारे पण खरंतर भारतीय जनता पक्षाच्या चिखलफेक सैन्याचं चिलखत घालून फिरणारे काही युट्युब प्रभावक यांच्यातल्या मैत्रीची 'फ्रेंडशिप फाईल' ऑडिओ क्लिप. यांत कोणी कोणाला ५०० कोटी दिले इथपासून ते थेट माध्यमांना आम्ही कशी जरब दाखवू शकतो, ते एखादा भावनिक मुद्दा सरकारच्या अंगाशी आला तर लगेच त्या मुद्द्यापासून लोकांचं लक्ष कसं भरकटवायचं यासाठी नवीन धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा कसा रेटला पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे याचीही चर्चा करताना ऐकायला येत आहे. ही क्लिप खरंतर २९ मिनिटांची आहे. त्यातल्या ५०० कोटींचा मुद्दा गाजतोय. त्यावर खुलासे येतील आणि यायलाच पाहिजेत. पण भारतीय जनता पक्ष काय पद्धतीने समाज माध्यमं, माध्यमं यांच्यावर दडपशाही आणत आहे यावर पण चर्चा व्हायला हवी'.

ते पुढे लिहितात, 'मुख्यमंत्र्यांनी मी ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागवला आहे असं म्हणून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला आहे. फॉरेन्सिक अहवाल हा ऑडिओ किंवा व्हिडिओची तथ्यता याबरोबर खून, बलात्कार, आर्थिक घोटाळे यांच्यासारख्या गंभीर गुन्ह्यात पुराव्यांची तथ्यता तपासण्यासाठी मागवला जातो. खरंतर यातलं संभाषण ऐकलं तर समजतंच आहे की हा लोकशाहीचा खुन आणि बलात्कारच आहे ! म्हणजे जे बोललं आहे ते गंभीर आहे आणि त्याची तपासणी व्हायला पाहिजे हे मुख्यमंत्र्यांना मान्य आहे हे बरं झालं'.

'पुराव्यातील तथ्य तपासाच पण यांत बोललं गेलं आहे याबद्दल तुम्ही जर अनभिज्ञ असाल तर तुमच्या पाठीमागे काय काय सुरु होतं हे पण तपासा. मुख्यमंत्री म्हणाले की ही क्लिप बहुदा २ वर्षांपूर्वीची असावी, ती आत्ताच का आली ? खरतर ही क्लिप बाहेर आली कशी आणि ती आणली कोणी हा पण महत्वाचा प्रश्न आहे. खरतर याच्यात सरकार मधलं नेहमीप्रमाणे शहा काट' शाहाचं' राजकारणच दिसतंय, आणि हो फॉरेन्सिक अहवाल, त्यातील तांत्रिकता याच्यात महाराष्ट्राला गोल गोल घुमवू नका. महाराष्ट्राला जे कळायचं आहे ते कळलं आहे. ते तुम्हाला मान्य आहे आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्ही किती निष्पक्ष आहात आणि तुम्ही कारवाई केली आहेत हे महाराष्ट्राला दाखवून द्या. तरंच या फॉरेन्सिकला अर्थ आहे, अन्यथा तुमच्या फायद्यासाठी वाकवलेला फॉरेन्सिक ठरेल', असं राज यांनी लिहिलं आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत ३१ मिनिटांहून अधिक कालावधीची एक ऑडिओ क्लिप उघड केली असून, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जरांगे यांच्यासह शिवसेना व भाजप नेत्यांनीही चौकशीची मागणी केली होती. या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपुरात केली.

या ऑडिओ क्लिपमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत मनोज जरांगेंना ५०० कोटी रुपये पोहोचवल्याचा उल्लेख आहे. तसेच भाजपकडून षडयंत्र रचले जात असल्याचा दावा देखील मनोज जरांगेंनी केला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलन कमजोर करण्यासाठी आणि आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी आपल्याविरोधात राजकीय षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. जरांगे यांनी ही ऑडिओ क्लिप "पुरावा" म्हणून समोर ठेवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.