मुंबई : खरा पंचनामा
राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आज (२५ ऑक्टोबर) दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अचानक कोअर कमिटीच्या बैठका पार पडल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुनील तटकरे आणि पक्षाच्या इतर काही नेत्यांनी थेट 'वर्षा' निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या भेटीचं नेमकं कारण काय? यावरून अनेक वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळालं.
पण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली? या भेटीत काय चर्चा झाली? या भेटीमागचं कारण काय? राष्ट्रवादीला अर्थखातं कधी मिळणार? राष्ट्रवादीचे ५ मंत्री खरंच बदलणार का? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली? यावर महत्वाचं भाष्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे पुन्हा अर्थखातं दिलं जावं, या मागणीसाठी आम्ही आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. या भेटीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही भुजबळांनी सांगितलं आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांच्यासह आदी नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली.
या भेटीबाबत माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितलं की, “आमचं म्हणणं एवढंच होतं की आता खूप दिवस झाले आहेत, त्यामुळे आमच्याकडे जे अर्थखातं होतं, ते आता पुन्हा आमच्या पक्षाकडे द्यायला पाहिजे. अर्थखातं राष्ट्रवादीकडे दिलं पाहिजे. कारण आमच्या आमदारांमध्ये याबाबत चर्चा होतात. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा होणं योग्य नाहीये. त्यामुळे या विषयांवर आमची फडणवीसांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. आम्ही लवकरच अर्थखातं देऊ असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या आधीच अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल”, असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे.
"आज आमची फक्त अर्थखात्याबाबत चर्चा झाली आहे. पण सध्या ज्या काही चर्चा सुरू आहेत की, दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार वगैरे, याबाबत आमच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. हा असा कोणताही विषय आमच्या अजेंड्यावर नव्हता आणि आताही नाही", असंही भुजबळांनी स्पष्ट केलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
