Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिकारीसाठी गेले, प्राण्याचे डोळे समजून आपल्याच सहकाऱ्याला गोळी घातली, घाबरून मृतदेहही जाळला

शिकारीसाठी गेले, प्राण्याचे डोळे समजून आपल्याच सहकाऱ्याला गोळी घातली, घाबरून मृतदेहही जाळला 



मुंबई : खरा पंचनामा 

ठाणे येथील घोडबंदर जवळील चेना जंगलात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शिकारीसाठी गेलेल्या एका गटात झालेल्या गैरसमजातून एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राण्याचे चमकणारे डोळे समजून अंधारात साथीदारावरच गोळी झाडल्याने मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी विजय सुखरू सापटे यांचा जागीच मृत्यू झाला, तर या घटनेत इतर दोघे जण जखमी झाले आहेत. घाबरून जाऊन मृतदेह लपवण्यासाठी पोलिसांनी कोणतीही सूचना न देता परस्पर अंत्यसंस्कार केल्याप्रकरणी डॉक्टरसह एकूण ६ जणांना अटक करण्यात आली आहे. 

१९ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास हे सर्व जण बेकायदेशीरपणे शिकारीसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या चेना बीटमध्ये उतरले होते. त्यांच्या हातात बंदुका, छर्रे आणि जंगलात वाट दाखवणाऱ्या बॅटऱ्या होत्या. जंगलात पोहोचल्यानंतर हा समूह दोन वेगवेगळ्या गटांत विभागला गेला. यादरम्यान, एका गटाच्या हातातील बॅटरीचा प्रकाश दुसऱ्या गटावर पडला. अंधारात चमकणारा तो प्रकाश बघून दुसऱ्या गटाचा गैरसमज झाला; त्यांना वाटले की समोर एखाद्या राण्याचे चमकणारे डोळे आहेत. विचार करण्याची उसंत किंवा शहानिशा करण्याची वेळच उरली नाही. एकाने क्षणाचाही विलंब न करता बंदुकीचा ट्रिगर दाबला. 

झाडलेली गोळी कोणा प्राण्याला नाही, तर विजय सुखरू सापटे यांच्या छातीत जाऊन शिरली. मिरा-भाईंदर महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करणारे विजय सापटे हे जागीच कोसळले आणि त्यांचा प्राण गेला. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे यावेळी मृत विजय सापटे यांचा अल्पवयीन मुलगाही घटनास्थळी उपस्थित होता. या गोळीबारात केवळ विजय यांचा बळी गेला नाही, तर कल्पेश ढंगाळा आणि कुणाल शेलार हे अन्य दोघे जणही जखमी झाले, ज्यांना नंतर काशिमीरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

आपल्याच सहकाऱ्याचा हत्येची दुर्घटना घडल्याचे समजताच साथीदारांचे पायखालची जमीन सरकली. पोलिसांना किंवा प्रशासनाला कळवले तर आपण अडकू, या भीतीने त्यांनी अत्यंत घाईघाईने विजय सापटे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार उरकून टाकले. एवढेच नव्हे तर, विजय यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे एक खोटे वैद्यकीय प्रमाणपत्रही मिळवले. परंतु, पोलीस तपासात त्यांचे कृत्य उघड झाले. स्थानिक काशिगाव पोलीस आणि वन विभागाच्या सतर्क यंत्रणेने या प्रकरणाचा छडा लावला. बनावट प्रमाणपत्र देणारा डॉक्टर राजेश पालांडे याच्यासह या संपूर्ण कटात सहभागी असलेल्या एकूण ६ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आता हे अवैध शस्त्र नेमके कोणाचे होते आणि गोळी नेमकी कोणी झाडली, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.