Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दिवाळी फराळ महागणार! खोबरे, शेंगदाणे, साखरेच्या दरात वाढ

दिवाळी फराळ महागणार! खोबरे, शेंगदाणे, साखरेच्या दरात वाढ



पुणे : खरा पंचनामा 

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने फराळासाठी लागणाऱ्या गोटा खोबरे, शेंगदाणे, साखर आणि गुळाच्या मागणीत वाढ झाली आहे. वाढत्या मागणीमुळे गोटा खोबऱ्याच्या भावात किलोमागे २० रुपये, शेंगदाण्याच्या भावात प्रकारानुसार ७ ते १० रुपये, तर साखरेच्या भावात २ ते ३ रुपयांनी वाढ झाली आहे.

दुसरीकडे, उत्पादन क्षेत्रातून आवक घटल्याने ज्वारी आणि बाजरीच्या भावात किलोमागे प्रत्येकी ३ ते ४ रुपये, तर गव्हाच्या भावात २ ते ३ रुपयांची तेजी आली आहे. मात्र, गुळाचे भाव स्थिर आहेत. तांदूळ, खाद्यतेल, डाळींसह अन्य किराणा मालाचे दरही मागील आठवड्याच्या तुलनेत कायम असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फराळाच्या साहित्याच्या खरेदीला वेग आला आहे. त्यामुळे बाजारात गोटा खोबरे, शेंगदाणे आणि साखरेला चांगला उठाव मिळत आहे. घाऊक बाजारात गोटा खोबऱ्याला क्विंटलमागे ३५ हजार ते ४० हजार रुपये भाव मिळत आहे. शेंगदाण्याला १२ हजार ५०० ते १५ हजार रुपये भाव मिळत आहे. साखरेचा भाव क्विंटलमागे ५ हजार ५५० ते ५ हजार ६०० रुपयांवर पोहोचला आहे. गुळाला मागणी वाढली असली, तरी त्याचे दर स्थिर असून, दर्जानुसार क्विंटलला ४ हजार ७०० ते ५ हजार २५० रुपये भाव मिळत आहे.

दरम्यान, पावसाने ओढ दिल्याने उत्पादन क्षेत्रातून अन्नधान्याची आवक घटली आहे. परिणामी, ज्वारी, बाजरी आणि गव्हाच्या भावात वाढ झाली आहे. ज्वारीमध्ये गावरान प्रकाराला क्विंटलमागे ४ हजार २०० ते ९ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. बाजरीला प्रकारानुसार ३ हजार २०० ते ४ हजार २०० रुपये, तर गव्हाला ३ हजार ३०० ते ७ हजार रुपये भाव मिळत आहे. तांदळाचे दर मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. नवरात्रोत्सव संपल्यानंतर साबुदाणा आणि भगरीची मागणी ओसरली आहे.

साबुदाण्याला क्विंटलमागे ७ हजार ५०० ते ८ हजार रुपये, वरई भगरीला २१ हजार ते २३ हजार रुपये, तर सावा भगरीला १९ हजार ५०० ते २० हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. नारळाची मागणी सध्या कमी असली, तरी दिवाळीत पुन्हा वाढण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. नारळाला प्रकारानुसार शेकड्यामागे २ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपये भाव मिळत आहे. मागणी आणि पुरवठ्यात समतोल असल्याने खाद्यतेल, डाळी, कडधान्ये, आटा, मैदा, पोहे आणि लाल मिरचीचे भाव स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.