ब्लॅकमेल करत विवाहितेवर ७ महिने सामूहिक अत्याचार, चौघा तरुणांना अटक; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
वैभववाडी : खरा पंचनामा
जिल्ह्यातील एका विवाहितेवर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सतत सात महिने सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी खांबाळे येथील चौघा तरुणांना वैभववाडी पोलिसांनी अटक केली. त्या सर्वांना आज सहा दिवसांची कोठडी मिळाली. त्यामध्ये विक्रांत रणजित पवार (वय २२), अक्षय कमलाकर चव्हाण (२८), परेश पंढरीनाथ साईल (२५), तुषार सुरेश कर्पे (२४, सर्व रा. ता. वैभववाडी) यांचा समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी: पीडित महिलेच्या कुटुंबाची विक्रांत पवार याच्याशी ओळख होती. तो येता-जाता घरातील सर्वांशी बोलत असे. तिचा पती कामानिमित्त दुसऱ्या जिल्ह्यात असतो. मार्च २०२६ मध्ये पीडित महिलेची सासू मुलीकडे गेली होती. ही संधी साधून विक्रांत रात्री आठच्या सुमारास घरी आला. बोलता-बोलता त्याने शीतपेयाची बाटली उघडली आणि एका ग्लासातून पीडित महिलेला दिले.
ते प्यायल्यानंतर तिचे डोके जड झाले. तिला भान नसल्याची संधी साधून त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला तुझा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल करेन, अशी वारंवार धमकी देऊन तो तिच्यावर सतत अत्याचार करत होता. त्यानंतर त्याचे मित्र अक्षय, परेश आणि तुषार यांनी देखील पीडित महिलेवर अत्याचार केला. कुणाला काही सांगितले तर तुला ठार मारू, अशी धमकी देखील त्यांनी दिली.
तुझे सर्व व्हिडिओ तुझ्या पतीला आणि गावात सर्वत्र व्हायरल करू, अशी धमकी देखील त्यांनी तिला सतत दिली. मार्च ते सप्टेंबर या कालावधीत सतत सात महिने तिच्यावर अत्याचार होत होते. ती घरात गप्प राहत असल्यामुळे दोन-तीन दिवसांपूर्वी पतीने तिच्याकडे विचारणा केली असता तिने सर्व माहिती सांगितली.
त्यानंतर मंगळवारी सायंकाळी तिने विक्रांत पवार, अक्षय चव्हाण, परेश साईल यांच्याविरोधात सामूहिक अत्याचार केल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरोधात सामूहिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तिघांना मंगळवारी रात्री, तर कर्पे याला आज सकाळी अटक केली. पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.