लेजच्या पाकिटावर १५ ग्रॅम वजन, प्रत्यक्षात फक्त ४ ग्रॅम; ग्राहकाच्या तक्रारीनंतर 'पेप्सीको'ला ग्राहक आयोगाचा दणका
जयपूर : खरा पंचनामा
लेजच्या चिप्सच्या पाकिटावर १५ ग्रॅम वजन नमूद असताना प्रत्यक्षात केवळ ४ ग्रॅम चिप्स आढळल्याच्या तक्रारीवरून जयपूरमधील जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने 'पेप्सीको इंडिया होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड'ला भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ग्राहकाला पाकिटाची किंमत ५ रुपये व्याजासह परत करण्याबरोबरच मानसिक त्रासापोटी ५ हजार रुपये आणि खटल्याच्या खर्चासाठी ३ हजार रुपये देण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. याबद्दल सविस्तर वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
'लाइव्ह लॉ'च्या वृत्तानुसार, जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोग-द्वितीयचे अध्यक्ष अशोक शर्मा तसेच सदस्य अजय कुमार आणि सुप्रिया अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय देण्यात आला. या प्रकरणात 'मेट्रो कॅश अँड कॅरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' या विक्रेत्याविरोधातील तक्रार मात्र आयोगाने फेटाळली.
जालान बिल्डिंग अँड हार्डवेअर स्टोअरचे संचालक चंद्रमन जालान यांनी १० नोव्हेंबर २०२० रोजी मेट्रो कॅश अँड कॅरी येथून घरातील पाहुण्यांसाठी विविध खाद्यपदार्थ खरेदी केले होते. यामध्ये लेजच्या चिप्सच्या एका पाकिटाचाही समावेश होता. खरेदी केल्यानंतर त्यांना त्याच दिवशी बिल देण्यात आले होते. पाहुण्यांना चिप्स देताना पाकीट अपेक्षेपेक्षा हलके असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पाकिटातील चिप्सचे वजन केले असता. त्यात केवळ ४ ग्रॅम चिप्स असल्याचे आढळल्याचा दावा असता, त्यात केवळ ४ ग्रॅम चिप्स असल्याचे आढळल्याचा दावा जालान यांनी केला. पाकिटावर मात्र त्याचे निव्वळ वजन १५ ग्रॅम नमूद होते. यासंदर्भात त्यांनी विक्रेत्याकडे तक्रार केली. मात्र, तक्रारीची योग्य दखल घेतली नसल्याचा आरोप करत त्यांनी ६ एप्रिल २०२२ रोजी ग्राहक आयोगात धाव घेतली. सेवेत त्रुटी आणि अनुचित व्यापार पद्धतींचा अवलंब केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता.
मेट्रो कॅश अँड कॅरीने आपली बाजू मांडताना चिप्सच्या वजनातील तफावत उत्पादन प्रक्रियेदरम्यान निर्माण झाली असण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे या प्रकरणाची जबाबदारी उत्पादक कंपनीवर निश्चित करावी, असा युक्तिवाद विक्रेत्याने केला.
दरम्यान, नोटीस बजावूनही 'पेप्सीको' आयोगासमोर हजर राहिले नाही. त्यामुळे कंपनीची बाजू ऐकून न घेता तिच्याविरोधात एकतर्फी सुनावणी करण्यात आली. जालान यांनी सादर केलेले खरेदीचे बिल आणि पाकिटातील चिप्सच्या वजनाबाबतचे पुरावे आयोगाने तपासले. त्यानंतर 'पेप्सीको 'विरोधातील तक्रार मंजूर करत मेट्रो कॅश अँड कॅरीविरोधातील तक्रार फेटाळण्यात आली.
आयोगाने 'पेप्सीको'ला चिप्सच्या पाकिटाची ५ रुपये किंमत ६ एप्रिल २०२२ पासून प्रत्यक्ष परतफेड होईपर्यंत वार्षिक सहा टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय मानसिक त्रासापोटी ५ हजार रुपये आणि खटल्याच्या खर्चासाठी ३ हजार रुपये देण्यास सांगितले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.