जत पोलीस ठाण्याच्या खंडणी व फायरींग गुन्ह्यात निलेश गडदे टोळीवर मोक्का मंजूर
सांगली पोलिसांची मोठी कारवाई
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली असून जत पोलीस ठाण्यातील खंडणी व फायरींगच्या गुन्ह्यात कुख्यात निलेश गडदे याच्या एन. जी. ग्रुप या संघटीत गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई मंजूर करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली असून, या प्रकरणी एकूण नऊ आरोपी मोक्काच्या कचाट्यात सापडले आहेत.
जत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात निलेश विठोबा गडदे हा टोळीप्रमुख असून त्याच्यासह सॅन्डी ऊर्फ संदेश रामचंद्र घागरे, अभिषेक जितेंद्र भोरे, दाजी राजाराम गडदे, अजित आबासाहेब दुधाळ, संभा ऊर्फ सुकुमार भागाप्पा माने, किरण शंकर लोखंडे, मलिक सलिम शेख आणि राजेंद्रसिंग बडवानीसिंग टकराना ऊर्फ पाजी यांचा या टोळीत समावेश आहे. या आरोपींनी एन. जी. ग्रुप नावाची संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करून खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, खंडणी मागणे, अवैध अग्निशस्त्र बाळगणे आणि नागरिकांमध्ये दहशत माजवणे यांसारखे गंभीर गुन्हे केले आहेत. सन २०१७ पासून सन २०२६ पर्यंत या टोळीने सांगली शहर, मिरज, कुपवाड, जत आणि आष्टा परिसरामध्ये सतत गुन्ह्यांची मालिका सुरू ठेवून स्वतःचे आर्थिक साम्राज्य व वर्चस्व निर्माण केले होते.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी आणि सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे मोक्का कलमांतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाचे गांभीर्यपूर्वक अवलोकन करून विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या नऊही आरोपींवर मोक्का कायद्यान्वये वाढीव कलमे लावून पुढील तपासास मंजुरी दिली आहे. यामुळे सांगली जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीचा कणा मोडण्यास मदत झाली असून यापुढील काळातही अशा टोळ्यांवर कडक कायदेशीर कारवाई कायम ठेवण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास जत उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून, ही कारवाई उच्च पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनखाली पार पडली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.