एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; अखेर शासन निर्णय जारी, यंदाची दिवाळी गोड होणार, वेळेआधी पगार मिळणार
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) सुमारे ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले होते.
त्यानंतर आता याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीसाठी 391.02 कोटी रुपये इतका निधी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
एसटी महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याला ७ ते १० तारखेदरम्यान देण्यात येते. मात्र, यंदा ६ नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत असल्याने कर्मचाऱ्यांना सणापूर्वीच वेतन मिळणे आवश्यक होते. दिवाळीच्या सणासाठी कुटुंबीयांसह खरेदी, घरगुती खर्च आणि इतर नियोजन करता यावे, यासाठी कर्मचाऱ्यांच्या हातात वेळेत पगार पडणे महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला वेतनासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसंच एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांच्या सणाच्या आनंदावर विरजण पडू नये, यासाठी प्रशासनाने या विषयाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी समन्वय साधून वेतन वितरणाचे नियोजन करावे आणि दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना पगार मिळेल, या दृष्टीने दक्षता घ्यावी, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर आता शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे.
"महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला सप्टेंबर, २०२६ च्या सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी ३९१.०२ कोटी रुपये इतकी रक्कम (अक्षरी रूपये तीनशे एक्याण्णव कोटी दोन लाख रुपये) रोखीने प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर निधी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षामधील "मागणी क्र.बी-३ लेखाशिर्ष २०४१ वाहनांवरील कर (००) ००१, संचालन व प्रशासन, (०१) परिवहन आयुक्त (०१) (०१) आस्थापना-परिवहन आयुक्त (अनिवार्य) (दत्तमत) (२०४१००१८) ३३-अर्थसहाय्य" या लेखाशिर्षामधून खर्च करण्यात यावा. सदरचे अर्थसहाय्य हे बिनशर्त आहे. यासाठी परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना प्राधिकृत करण्यात येत असून त्यांच्या कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी असलेले लेखाधिकारी यांनी सदर रक्कम आंहरित करुन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास अदा करावी," असंही शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.