Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नागपूर पदवीधरमध्ये बोगस मतदान? महिला मतदाराचे नावे दुसऱ्याने बजावला हक्क

नागपूर पदवीधरमध्ये बोगस मतदान? महिला मतदाराचे नावे दुसऱ्याने बजावला हक्क 



नागपूर : खरा पंचनामा 

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बोगस मतदानाच्या आरोपांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सावनेरमध्ये एका मतदाराच्या नावावर आधीच मतदान झाल्याचा प्रकार समोर आल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे. 

सावनेर येथील मतदान केंद्र क्रमांक १८ वरील अनुक्रमांक १३ वर श्रीमती प्रीती अजय बंड यांच्या नावावर आधीच मतदान झाल्याचे आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. मतदानासाठी केंद्रावर गेलेल्या बंड यांनी याबाबत आक्षेप नोंदविल्यानंतर त्यांना टेंडर व्होटिंगची प्रक्रिया पूर्ण करावी लागली. मतदार केंद्रावर प्रत्यक्ष हजर असताना त्यांच्या नावावर यापूर्वी मतदान कोणी केले, हा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. 

संबंधित मतदाराच्या नावावर झालेल्या मतदानाची पडताळणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी करण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी संबंधित मतदान केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज, मतदानाची स्लिप आणि अधिकृत नोंदी तातडीने सार्वजनिक कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. मतदान केंद्रावरील नोंदींची तपासणी करून नेमकी चूक कुठे झाली, याचा शोध घेण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. 

मतदार यादी तयार करणे, तिची पडताळणी करणे आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडणे यासंदर्भातील जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही होत आहे. चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्यांतील दुबार नोंदींचा मुद्दा उपस्थित केला आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत आठ हजार ७४४ दुबार मतांची माहिती समोर आली होती, असा दावा त्यांनी केला. 

यासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयुक्त आणि नागपूरच्या निवडणूक अधिकाऱ्यांना पुराव्यांसह माहिती देण्यात आल्याचे लोंढे यांनी सांगितले. मात्र, या तक्रारींवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मतदार याद्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह विधानसभा, लोकसभा आणि महापालिका निवडणुकांनंतर आता पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्यांमध्येही दुबार नावांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. एका मतदाराचे नाव दोन ते तीन वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर नोंदवले गेल्याचे दावे करण्यात आले आहेत. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेनंतरही हा प्रश्न कायम असल्याची बाब अधोरेखित करण्यात येत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.