राहुल गांधींच्या आंदोलनानंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! ज्ञानेश कुमार यांचा 'या' राज्यातील दौरा स्थगित
नवी दिल्ली : खरा पंचनामा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या छत्तीसगड दौऱ्याला स्थगिती देण्यात आली आहे. ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी त्यांचा छत्तीसगड दौरा नियोजित होता. मात्र, काही महत्त्वाच्या कारणांमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने निवेदनाद्वारे दिली आहे. दौऱ्याची नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
मंगळवारी (६ ऑक्टोबर) इंडिया आघाडीच्या खासदारांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मोर्चा काढला. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा दलांनी त्यांना आकाशवाणी भवन संकुलाजवळ अडवले.
यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आकाशवाणी भवन परिसरातच धरणे आंदोलन केले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये काहीसा संघर्ष झाल्याचे सांगण्यात आले. रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेस तसेच मित्रपक्षांच्या काही नेत्यांना ताब्यात घेतले. त्यांना बसमधून नेण्यात आले. त्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांची पोलिस ताब्यातून सुटका करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली.
विरोधी पक्षांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे. तसेच मतदार याद्यांच्या 'विशेष सखोल पुनरावृत्ती' म्हणजेच SIR प्रक्रियेला विरोध करण्यात येत आहे. SIR प्रक्रिया रद्द करण्याची मागणीही INDIA आघाडीने केली आहे.
दरम्यान, ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा पुढे ढकलण्यात आल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. आयोगाने मात्र दौरा स्थगित करण्यामागे नेमके कोणते कारण आहे, याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. त्यामुळे या निर्णयाचा मंगळवारी झालेल्या आंदोलनाशी काही संबंध आहे का, याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
यापूर्वी ज्ञानेश कुमार यांचा उत्तर प्रदेश दौराही स्थगित करण्यात आला होता. या दौऱ्यात त्यांना दोन ठिकाणी भेटी देण्याचे नियोजन होते. दरम्यान, देशातील विविध ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात निदर्शने सुरू असून, विरोधी पक्षांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.