Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत घरफोडी आणि दुचाकी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंदएलसीबीची धडक कारवाई, दोन गुन्हे उघडकीस

सांगलीत घरफोडी आणि दुचाकी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद
एलसीबीची धडक कारवाई, दोन गुन्हे उघडकीस

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) घरफोडी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला जेरबंद करून दोन महत्त्वपूर्ण गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे व सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. या कारवाईत रोहीत बाजीराव आकळे (वय ४० वर्षे, रा. गोळेवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) या सराईत आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ५५ हजार रुपये किंमतीची दुचाकी आणि ५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक परिसरातील गुन्हेगारांची माहिती काढत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी रोहीत आकळे हा आष्टा शहरात चोरीच्या उद्देशाने फिरत असून त्याच्या ताब्यात चोरीची दुचाकी आहे. या बातमीच्या आधारे पोलिसांनी आष्टा ते पेठ रस्त्यावर सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात ५०० रुपये दराच्या १० नोटा म्हणजेच ५ हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली.

पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, ही रोख रक्कम त्याने शिगाव येथील अनिल शामराव पाटील यांच्या कार्यालयातून घरफोडी करून चोरल्याची आणि उर्वरित रक्कम खर्च केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर दुचाकी ही सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथून चोरल्याचे त्याने मान्य केले. या कारवाईमुळे आष्टा पोलीस ठाण्यातील घरफोडीचा आणि सातारा जिल्ह्यातील उंब्रज पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरीचा असे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त मुद्देमालासह आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी आष्टा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेंद्र यादव, संदीप गुरव, अतुल माने, अरुण पाटील, मच्छींद्र बर्डे, उदयसिंह माळी, सुरज थोरात, संकेत कानडे, रोहन घस्ते, पवन सदामते, अमोल शिंदे, संतोष माने, विजय पाटणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.