Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दुष्काळी १९ तालुक्यांची यादी जाहीर, मातब्बर नेत्यांच्या तालुक्यांचा समावेश

दुष्काळी १९ तालुक्यांची यादी जाहीर, मातब्बर नेत्यांच्या तालुक्यांचा समावेश

मुंबई : खरा पंचनामा 

दुष्काळी तालुक्यांच्या यादीवरून मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी व्यक्त केलेली नाराजी तसेच सत्ताधारी आमदारांचा आक्षेप यानंतर आणखी १९ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

नव्याने जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, खासदार अशोक चव्हाण, आमदार सुधिर मुनगंटीवार या सत्ताधाऱ्यांसोबतच काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्या मतदार संघातील तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पहिल्या टप्यात शनिवारी २६५ तालुक्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. दुष्काळी तालुक्यांच्या यादीवरुन मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मंत्र्यांनी उघड नाराजी व्यक्त करीत आपल्याही मतदार संघात दुष्काळ असल्याची गंभीर बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली होती. त्यावर मंत्री तसेच आमदांच्या मागणीचा विचार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी मंत्रीमंडळ उपसमितीस दिले होते. त्यानुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंत्री आणि आमदारांच्या मागणीनुसार ४३ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन विभागास देण्यात आले होते. त्यानुसार विभागाने आज आणखी १९ तालुक्यांची यादी जाहीर केली. या तालुक्यातील प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण, प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांनी तातडीने अहवाल सादर करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

जाहीर झालेले दुष्काळी तालुक्यांची यादी :
नांदेड - मुदखेड, मुखेड व अर्धापूर
चंद्रपूर - जिवती, ब्रह्मपुरी व बल्लारपूर
गोंदिया – आमगाव, देवरी, सालेकसा व गोंदिया
वर्धा - कारंजा
भंडारा - मोहाडी व तुमसर
नाशिक - त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाड
सातारा - पाटण

दुष्काळी तालुक्यांची पहिली यादी जाहीर झाल्यावर राजकीय नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. या विरोधात आवाज उठविलेल्या नेतेमंडळींच्या तालुक्यांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्हयातील मुदखेड, मुखेड व अर्धापूर, भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या चंद्रपूर जिल्हयातील जिवती, ब्रह्मपुरी व बल्लारपूर तसेच पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्याचा समावेश आहे.

ट्रिगर-१ यादीतील तालुक्यांव्यतिरिक्त ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता आहे, त्यांचाही आवश्यकतेनुसार विचार करण्यासाठी स्थानिक पातळीवरील माहिती व अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पीकपंचनामे तातडीने पूर्ण करणे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवणे तसेच प्रशासन अधिक सतर्क ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

दुष्काळाबाबतच्या शासन निर्णयानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याबाबत राष्ट्रीयकृत बँकांना सूचना द्याव्यात. तर दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांकडून कर्जवसुली करताना कोणतीही सक्ती होणार नाही, याबाबत खासगी बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकांना सूचना सहकार विभागामार्फत दिल्या जाव्यात, असेही आदेश देण्यात आले आहेत.

दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. दुष्काळाच्या काळात प्रशासकीय यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्यरत राहावी, यासाठी आवश्यक प्रशासकीय उपाययोजना करण्याचे आदेशही मंत्रिमंडळ उपसमितीने दिले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.